Crime News: मंत्री सतेज पाटील यांच्या नावाने फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 10:42 AM2022-06-19T10:42:23+5:302022-06-19T10:42:55+5:30
Crime News: मंत्री सतेज पाटील यांच्या नावाचा वापर करून दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे येथे उघडकीस आला आहे. याबाबत विनायक शंकरराव पाटील ऊर्फ विनायक शंकरराव रामुगडे व इतर अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
नवीन पनवेल : मंत्री सतेज पाटील यांच्या नावाचा वापर करून दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे येथे उघडकीस आला आहे. याबाबत विनायक शंकरराव पाटील ऊर्फ विनायक शंकरराव रामुगडे व इतर अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
स्वारगेट पुणे येथील सुजाता राकेश चंद्र (४२) या महिलेची मे. विज्ञानविद्या प्रा.लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता असल्याने गेल्या एक वर्षापासून बँक तसेच इन्व्हेस्टर यांच्याकडे त्या प्रयत्न करत होत्या. यावेळी कामोठे येथील अशोक जाधव यांच्याशी त्यांची ओळख झाली. यावेळी जाधव यांनी त्यांचा विनायक पाटील यांच्याशी संपर्क साधून दिला.
पाटील यांनी त्यांना सांगितले की, राज्याचे मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत माझे जवळचे संबंध असून काम करून देतो. मात्र, त्या बदल्यात लोन रकमेच्या अर्धा टक्का कमिशन ॲडव्हान्स त्यांच्या स्विय सहायकास द्यावा लागेल, तसेच सतेज पाटील यांच्याकडून कंपनीस रुपये ५ कोटींची गुंतवणूक करून दिली जाईल व याकरिता आम्हाला त्यांना ६ टक्के व्याज द्यावे लागेल, तसेच विनायक पाटील यांनी पाटील यांचे स्वीय सहाय्यक भोसले यांच्याशी त्या महिलेचा संपर्क करून दिला. तेव्हा फोनवरील व्यक्तीने तुमचे काम होऊन जाईल, असे सांगितले. यावर विश्वास ठेवत त्यांनी अडीच लाख रुपये दिले, तसेच प्रपोजल फाइल व पैसे मंत्री पाटील यांच्या स्वीय सहायकाकडे अनिश कांबळी यांच्यामार्फत पाच हजार रुपये घेतले. तुळजापूर येथील ६० एकर जमीन जागा त्या महिलेच्या नावावर करतो व त्या जमिनीच्या बदल्यात लोन मिळेल, असे सांगून ६ लाख रुपयांची मागणी केली. असे करून एकूण या महिलेकडून दहा लाख पाच हजार रुपये आरोपींनी खोटे बोलून काढून घेतले.