धक्कादायक! फक्त एका पिझ्झासाठी तरुणीने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:37 PM2021-10-14T16:37:11+5:302021-10-14T16:48:53+5:30
Crime News : एका 18 वर्षांच्या तरुणीने वाढदिवसानंतर अवघ्या दोनच दिवसात आई-वडिलांनी पिझ्झा (Pizza) दिला नाही म्हणून आत्महत्या केली आहे.
नवी दिल्ली - देशामध्ये अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. पिझ्झा न मिळाल्याने एका तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशमध्ये एका 18 वर्षांच्या तरुणीने वाढदिवसानंतर अवघ्या दोनच दिवसात आई-वडिलांनी पिझ्झा (Pizza) दिला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ललितपूर जिल्ह्यात तालाबपुरा परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय शिखा सोनी या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शिखाच्या आत्महत्येमागे क्षुल्लक कारण समोर आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिखाचे वडील मोहनलाल सोनी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूआधी दोनच दिवसांपूर्वी शिखाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी तिने आपल्याकडे पिझ्झा ऑर्डर करण्याचा हट्ट धरला होता, पण वाढदिवसादिवशी पिझ्झा मागवण्याऐवजी दुसऱ्या दिवशी मागवण्याची सूचना आई-वडिलांनी तिला केली. पण नंतर काही कारणांनी त्या दोन दिवसांत पिझ्झा मागवणं जमलं नाही.
आई-वडिलांना मोठा धक्का
पिझ्झामुळे नाराज झालेल्या शिखाने आपल्या खोलीत जाऊन पंख्याला लटकून गळफास घेतला. पालकांनी तिच्या खोलीत डोकावून पाहिलं असता तिने गळफास लावून घेतल्याचं दिसून आलं. शिखा घरात सर्वांत लहान होती. तिला दोन मोठ्या बहिणी आहेत. शिखाने नुकताच नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता आणि जिल्हा रुग्णालयात तिचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण सुरू होतं. मात्र अशा क्षुल्लक कारणामुळे शिखाने आत्महत्या केल्यानं तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.