एव्हरग्रीन हॉटेलात पुन्हा एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान बनले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 02:13 PM2022-08-19T14:13:09+5:302022-08-19T14:13:38+5:30
आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण काय हे कळू शकले नाही. दोन महिन्यापूर्वी वडीलांनी गाडी घेऊन दिली नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न तरुणाने केला होता, असे ठाणेदार दिनेश तायडे यांनी सांगितले.
- नरेश रहिले
गोंदिया: ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कारंजा परिसरातील एव्हरग्रीन हॉटेलात १८ ऑगस्टच्या रात्री एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी असून त्याला उपचारसाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
शतक जांगळे (२१) रा. फुलचूर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण कळू शकले नाही. तो बेशुध्द असून त्याच्यावर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. या एव्हरग्रीन हॉटेलात नागपूरच्या एका तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत रात्र घालवून रात्रीच विषप्राशन करून दोघांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आमगावच्या बजरंग चौकात राहणाऱ्या २१ वर्षाच्या तरूणाने आमगावातील एका २० वर्षाच्या तरूणीवर बलात्कार केला होता. या दोन्ही घटनांची नोंद गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात आहे.
आता शतक जांगळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण काय हे कळू शकले नाही. याची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलीस त्याचा जबाब घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते. परंतु तो बेशुध्द असल्याने २४ तासांपर्यंत जबाब घेण्यास डॉक्टरांनी मनाई केली. यापूर्वीही शतक जांगळे याने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. दोन महिन्यापूर्वी वडीलांनी गाडी घेऊन दिली नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न शतकने केला होता असे ठाणेदार दिनेश तायडे यांनी सांगितले.