Crime News: घराच्या नोंदीसाठी लाच स्वीकारणारा ग्रामसेवक जेरबंद, एसीबीची कारवाई, मांडवा येथील प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 04:10 PM2022-09-14T16:10:48+5:302022-09-14T16:13:03+5:30
Crime News: घराची नोंद करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना मांडवा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने १४ सप्टेंबर रोजी रिसोड येथे रंगेहात पकडले. प्रेमानंद शामराव मनवर असे आरोपी ग्रामसेवकाचे नाव आहे.
- संतोष वानखडे
वाशिम - घराची नोंद करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना मांडवा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने १४ सप्टेंबर रोजी रिसोड येथे रंगेहात पकडले. प्रेमानंद शामराव मनवर असे आरोपी ग्रामसेवकाचे नाव आहे.
मांडवा येथील तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे असलेल्या घराची नोंद तक्रारदाराच्या नावावर करावयाची होती. यासाठी ग्रामसेवक प्रेमानंद मनवर यांच्याशी संपर्क साधला असता, नोंद करून देण्यासाठी ६ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये स्वीकारले. दुसऱ्या टप्प्यात पाच हजार रुपये द्यावयाचे होते. बुधवारी (दि.१४) रिसोड येथे सापळा रचला असून, आरोपीने तक्रारदाराकडून पाच हजार रुपयाची लाच स्वीकारली. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून, लाच रक्कम जप्त करण्यात आली. रिसोड पोलीस स्टेशनला आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाइ पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत व देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक गजानन शेळके व चमूने पार पाडली.
लाचखोरांचे धाबे दणाणले!
घर किंवा जागा नावावर करून देणे, घरकुल, आठ अ यांसह इतरही कामे करून देण्याच्या नावाखाली यापूर्वीही ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवकांनी लाच स्विकारल्याची प्रकरणे घडली आहेत. आता त्यात मांडवा येथील ग्रामसेवकाच्या प्रकरणाची भर पडली. बुधवारच्या या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणल्याचे दिसून आले.