मोठी कारवाई! गुजरातच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं 376 कोटींचं हेरॉइन; पंजाबमध्ये जाणार होता माल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 09:26 AM2022-07-13T09:26:44+5:302022-07-13T09:28:24+5:30
Gujarat ATS Seizes Heroin : कच्छ जिल्ह्यामध्ये मुंद्रा बंदराजवळ आढळून आलेल्या एका कंटेनरमध्ये तब्बल 376 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे हे अमली पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली - गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. एटीएसने केलेल्या कारवाईत 75.3 किलो हेरॉइन जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कच्छ जिल्ह्यामध्ये मुंद्रा बंदराजवळ आढळून आलेल्या एका कंटेनरमध्ये तब्बल 376 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे हे अमली पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुजरातएटीएस आणि पंजाब पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षकांनी या कंटेरनमध्ये संशयास्पद वस्तू असल्याच्या शक्यतेने केलेल्या छापेमारीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती गुजरात पोलिसांचे डीजीपी आशिष भाटिया यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातीमधील अजमान फ्री झोनमधून हा माल मुंद्रा बंदरामध्ये आणण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हा माल पंजाबमध्ये पाठवण्यात येणार होता. 13 मे रोजी सर्व माल मुंद्रा बंदरामध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कंटेरनमधील अमली पदार्थ लपवण्यासाठी कार्डबोर्डचे पाईप वापरण्यात आले होते. हे पाईप कार्डबोर्डचे वाटू नयेत म्हणून त्यावर निळ्या रंगाचं प्लास्टिक लावून हेरॉइन लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
The consignment had arrived at Mundra port on May 13 from Ajman Free Zone in UAE & was to be transported to Punjab. The contraband was kept concealed in a container of unstitched clothes using a cardboard pipe that was further camouflaged by an oversized plastic pipe: Gujarat DGP pic.twitter.com/OkoIeFpvjV
— ANI (@ANI) July 12, 2022
भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने 75.3 किलो हेरॉईन जप्त केले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे किंमत 376.5 कोटी रुपये आहे. कंटेनर पंजाबला नेण्यात येणार होता आणि याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी देखील काही दिवसांपूर्वी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सागरी किनारी भागात एका खाडीतून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी जप्त केलेल्या या बॅगांमध्ये तब्बल 250 कोटी रुपयांचं हेरॉइन सापडलं होतं. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पोलिसांनी जखाऊजवळ 49 बॅग जप्त केल्या होत्या. हे हेरॉईन पाकिस्तान तस्करांकडून फेकण्यात आल्याचंही एटीएसने स्पष्ट केलं होतं.
तटरक्षक दल आणि एटीएसनं याअगोदर 30 मे रोजी अरबी समुद्रातून भारतीय सीमेअंतर्गत सात पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. 'गुजरातमध्ये अंमली पदार्थाची तस्करीच्या योजना आखणाऱ्या तस्करांसंबंधित मिळालेच्या सूचनेवरुन, बोटीचा कॅप्टन मोहम्मद अक्रम याने तटरक्षक दलाचे जहाज जवळ येताच दोन पिशव्या समुद्रात फेकून दिल्या होत्या, अशी माहिती गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक बी. पी. रोझिया यांनी दिली होती. तटरक्षक दल आणि एटीएसने 30 मे रोजी अल नोमान या पाकिस्तानी बोटीसह सात जणांना अटक केली होती. एटीएसने हस्तगत केलेल्या 49 बॅगमध्ये सुमारे 50 किलो हेरॉईन होतं. या प्रत्येक पॅकेटचं वजन जवळपास 1 किलो होते. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 250 कोटी रुपये आहे, अशी माहितीही रोझिया यांनी दिली होती.