Crime News: एटीएममध्ये सापडला छुपा कॅमेरा, कार्ड स्किमर, आरबीएल बँकेच्या ग्राहकांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 10:14 AM2022-04-06T10:14:02+5:302022-04-06T10:14:19+5:30
Crime News: एटीएम पिन चाेरून किंवा त्याचे क्लाेनिंग करून ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचे प्रकार अनेकदा घडतात. मीरा राेडमध्ये एका एटीएममध्ये पिन टाकताना ताे जाणून घेण्यासाठी गाेपनीय कॅमेरा आणि कार्ड स्किमर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मीरा रोड : एटीएम पिन चाेरून किंवा त्याचे क्लाेनिंग करून ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचे प्रकार अनेकदा घडतात. मीरा राेडमध्ये एका एटीएममध्ये पिन टाकताना ताे जाणून घेण्यासाठी गाेपनीय कॅमेरा आणि कार्ड स्किमर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मीरा राेड पाेलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कनकिया परिसरात इरासियामध्ये आरबीएल बँकेच्या शाखेलगतच एटीएम सेंटर आहे. या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत मारुती पाटील हे रखवालदार नेमले आहेत. या वेळेनंतर तेथे कुणीच नसते. पाटील यांनी एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येतात, तेथून पडलेली वस्तू त्यांनी बँकेचे सहायक व्यवस्थापक राेहित कावर यांना दाखवली. तेव्हा ग्राहकांचे डेबिट कार्ड काॅपी करण्यासाठी स्किमर बसविल्याचे लक्षात आले. तर की-पॅडच्या वरच्या बाजूला पत्र्याच्या प्लेटवर गोपनीय कॅमेरा चिकटवल्याचेही आढळून आले. त्याला बॅटरी आणि १६ जीबीचे मेमरी कार्ड जोडलेले होते. या कॅमेऱ्याद्वारे ग्राहकांचा पिन नंबर टिपला जात हाेता. चाैकशीत या एटीएममधून काही ग्राहकांचे बँक खात्यातून परस्पर पैसे काढण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर ५ एप्रिलला कवर यांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर एटीएममध्ये २४ तास सुरक्षारक्षक ठेवण्याची व सीसीटीव्ही यंत्रणा आणि फुटेज देखरेखीखाली ठेवण्याची मागणी हाेत आहे.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास
- एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.
- त्यात कॅमेरा व स्किमर लावणाऱ्याचे फुटेज तपासले जात आहेत.
- नेमक्या किती ग्राहकांची आणि किती रक्कम भामट्याने खात्यातून काढली, याचा तपशील समजू शकलेला
नाही.
- घटनेप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.