Crime News: लव्ह ट्रँगलमधून भयानक हत्याकांड, आधी सोशल मीडियावर दिली धमकी, त्यानंतर एक्स-गर्लफ्रेंडच्या प्रियकराची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 18:06 IST2021-11-15T18:06:30+5:302021-11-15T18:06:58+5:30
Murder In Love Triangle: प्रेमाच्या त्रिकोणामधून एका विद्यार्थ्याने एका स्क्रॅप व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडामधील आरोपी हा १९ वर्षांचा असून, तो जयपूरमध्ये बीएससी करत आहे.

Crime News: लव्ह ट्रँगलमधून भयानक हत्याकांड, आधी सोशल मीडियावर दिली धमकी, त्यानंतर एक्स-गर्लफ्रेंडच्या प्रियकराची केली हत्या
अलवर (राजस्थान) - प्रेमाच्या त्रिकोणामधून एका विद्यार्थ्याने एका स्क्रॅप व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडामधील आरोपी हा १९ वर्षांचा असून, तो जयपूरमध्ये बीएससी करत आहे. हत्या करण्यापूर्वी आरोपीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून हत्यार दाखवत धमकी दिली. त्यानंतर सोशल मीडियावरील हा फिल्मी वाद अखेर वास्तवात बदलला आणि आरोपीने स्क्रॅप व्यावसायिकाला घराबाहेर बोलावून त्याच्या छातीवर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी हत्येच्या पाचव्या दिवशी रविवारी भरतपूर येथील डीग येथून अटक केली. दरम्यान, या हत्येमागे प्रेम त्रिकोणाचा धागा असल्याचे तपासामधून समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलवर शहरातील ६० फूट रोडवर ९ नोव्हेंबर रोजी आकाश नावाच्या एका तरुणाची घराबाबेर बोलावून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणारा आरोपी त्याच्याच ओळखीमधील पवन हा असल्याचे समोर आले आहे. पवनने रात्री पावणे नऊच्या सुमारास आकाशला घराबाहेर बोलावले त्यानंतर त्याच्यावर गोळी झाडली.
आकाश स्क्रॅपचा व्यावसायिक होता. तर पवन हा जयपूर नॅशनल विद्यापीठामधून बीएससीचे शिक्षण घेत आहे. हे दोघेही एकाच तरुणीवर प्रेम करत होते. तसेच त्यावरून त्यांच्यात वाद होते. ही तरुणी आधी पवनसोबत नात्यात होती. त्यानंतर त्याला सोडून तिने आकाशशी नाते जोडले. या वादातून दोघेही एकमेकांना धमक्या देत होते. अखेर पवनने अवैध कट्ट्याचा वापर करत आकाशचा काटा काढला.
पवन यादवने गोळ्या झाडण्यापूर्वी सुमारे २० तास आधी सोशल मीडियावर गोळी झाडण्याचा व्हिडीओ स्वत:च्या बॅकग्राऊंड फोटोसह शेअर केला होता. तसेच एक एक करून ठो ठो, सहाच्या सहा गोळ्या छातीत उतरतील, असे त्याखाली लिहिले होते.
आता अलवर पोलिसांनी पवनला डीग येथून अटक केली आहे. पवनने हत्या केल्याचे कबूल केले आहे. मात्र गुन्ह्यासाठी वापलेले शस्त्र अद्याप जप्त झालेले नाही. आता पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करून रिमांड घेईल. त्यानंतर होणाऱ्या चौकशीमधून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.