सावधान! पॅन कार्ड अपडेट करणं महिलेला पडलं महागात; लाखो रुपयांचा गंडा, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 02:09 PM2022-05-18T14:09:54+5:302022-05-18T14:11:50+5:30

Cyber Fraud : 34 वर्षीय महिलेच्या खात्यातून सायबर फ्रॉडने तब्बल 1 लाख 80 हजार रुपये काढून घेतले आहेत.

Crime News how to avoid cyber fraud Pan Card update Fraud | सावधान! पॅन कार्ड अपडेट करणं महिलेला पडलं महागात; लाखो रुपयांचा गंडा, झालं असं काही...

सावधान! पॅन कार्ड अपडेट करणं महिलेला पडलं महागात; लाखो रुपयांचा गंडा, झालं असं काही...

Next

नवी दिल्ली - मुंबईतील एका खासगी कंपनीत अकाऊंट ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या 34 वर्षीय महिलेच्या खात्यातून सायबर फ्रॉडने तब्बल 1 लाख 80 हजार रुपये काढून घेतले आहेत. हे काम करण्यासाठी चोरांनी फिशिंग लिंकचा वापर केला होता. फिशिंग लिंक म्हणजेच खऱ्या लिंकप्रमाणेच दिसणारी फेक लिंक असते. महिलेने त्या लिंकवर क्लिक करताच तिचा फोन हॅकर्सनी हॅक केला आणि त्यांनी तिच्या अकाउंटमधील सर्व पैशांवर डल्ला मारला. याप्रकरणी महिलेनं 16 मे रोजी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलंय, ती 9 मे रोजी विलेपार्ले (पश्चिम) येथील तिच्या ऑफिसमध्ये काम करत होती. त्याचवेळी तिच्या फोनवर लिंक असलेला टेक्स्ट मेसेज आला. या मेसेजमध्ये तिला पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगितलं होतं. महिलेला वाटलं की हा बँकेचा मेसेज आहे. त्यामुळे तिने लिंकवर क्लिक केलं. त्यानंतर तिथं एचडीएफसी बँकेचं बनावट वेबपेजही उघडलं. तिथं तिला तिचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकण्यास सांगण्यात आलं. ते टाकताच तिच्या फोनवर OTP आला. यानंतर तिला ओटीपी आणि पॅन नंबरची माहिती विचारण्यात आली.

महिलेने तिचा ओटीपी आणि पॅन कार्ड डिटेल टाकताच तिच्या बँक खात्यातून 1.80 लाख रुपये काढण्यात आले. तिच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा मेसेज बघताच महिलेला धक्का बसला आणि तिने बँकेत फोन करून अकाउंट ब्लॉक केलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

पोलीस अधिकार्‍यांच्या मते, युजरचा निष्काळजीपणा हा सायबर फसवणुकीच्या घटनांमागचं मुख्य कारण आहे. कोणतीही बँक पॅन किंवा आधार अपडेट करण्यासाठी फोनवर अशी लिंक पाठवत नाही किंवा कोणाला कॉलही करत नाही, हे लक्षात ठेवा. असा कॉल किंवा मेसेज अथवा लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका नाहीतर सायबर चोर तुमची फसवणूक करतील. पोलिसांच्या मते, कोणत्याही प्रकारची लिंक फोनवर आली असेल त्यावर कधीही क्लिक करू नका. त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा फोन हॅक होऊ शकतो आणि तुम्ही सायबर चोरीला बळी पडू शकता. झी न्यूज हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News how to avoid cyber fraud Pan Card update Fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.