मुंबईत फटाके फोडण्यावरून वाद, 3 अल्पवयीन मुलांनी 21 वर्षांच्या तरुणाला चाकूनं भोसकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 09:03 PM2022-10-24T21:03:18+5:302022-10-24T21:04:51+5:30
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे.
मुंबईत फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात 3 अल्पवयीन मुलांनी 21 वर्षीय तुरूणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शिवाजीनगर भागात 3 अल्पवयीन मुलांनी लात-बुक्के आणि चाकूने वार करून तरुणाची हत्या केली. मृत तरुणाचे नाव सुनील शंकर नायडू असे आहे. ही घटना सोमवारी दुपारी साधारणपणे 2 वाजताच्या सुमारास बिल्डिंग क्रमांक 15 B, नटवर पारेख कंपाउंड जवळ घडली. येथे फटाके फोडण्यावरून वाद झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दुपापच्या सुमारास एक 12 वर्षांचा मुलगा काचेच्या बाटलीत फटाका फोडत होता. हे पाहून सुनील नायडूने त्याला रोखले आणि तेथून हकलून दिले. यानंतर संबंधित 12 वर्षांचा मुलगा आपल्या एका 15 वर्षांच्या भावाला आणि 14 वर्षांच्या मित्राला घेऊन आला आणि या तिघांनी सुनील नायडूला मारहाण केली.
या तिघांनी मिळून सर्वप्रथम सुनील नायडूला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्यावर चाकूने वार केले. यानंतर स्थानिक लोक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे.
मृत सुनील नायडूचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. काचेच्या बाटलीत फटाका फोणाऱ्या 12 वर्षीय मुलाचे नाव आकाश मंडल, त्याच्या भावाचे नाव विकास मंडल (15) आणि 14 वर्षांच्या त्याच्या मित्राचे नाव विकास शिंदे, असे आहे.