धक्कादायक! सणासुदीच्या काळात चैन स्नॅचिंगची वाढली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 05:01 PM2021-09-13T17:01:13+5:302021-09-13T17:02:21+5:30
Crime News : भाईंदरमध्ये चेन स्नेचर सक्रिय असून दोन घटनांमध्ये दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून चोरट्यांनी पळ काढला आहे.
मीरारोड - सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून महिलांनी काळजी घेतली नाही तर सण चोरट्यांसाठी सुगीचा ठरणार आहे. मीरा भाईंदरमध्ये चेन स्नेचर सक्रिय असून दोन घटनांमध्ये दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून चोरट्यांनी पळ काढला आहे.
मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शीतल नगर, एमटीएनल मार्गावरील डिसीबी बँकेजवळ बेबीकुमारी पाटकर (४२) यांच्या गळ्यातील ४४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र वेगाने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले.
त्या आधी काशीमीरा येथील संत एन्स रुग्णालयाच्या समोर बस स्थानक येथे आशादेवी कुंभार यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची सोनसाखळी मारून दुचाकी स्वाराने पोबारा केला. आशादेवी पतीसह ठाण्याला जाण्यासाठी सकाळी थांबल्या असता दुचाकी बिघडल्याचे कारण सांगून चोरट्याने डाव साधला. या आधी नवघर पोलीस ठाण्यात सुद्धा चेन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या आहेत.