सख्खा भाऊच झाला वैरी! कुऱ्हाडीने वार करून केली वहिनीसह भावाची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 06:06 PM2021-10-03T18:06:34+5:302021-10-03T18:14:23+5:30
Crime News : पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली असून याचा अधिक तपास करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली - छत्तीसगडच्या (Chhattisgarh) जशपूर (Jashpur) मध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सख्खा भाऊच पक्का वैरी झाल्याचं समोर आलं आहे. एका व्यक्तीने जादू-टोण्याच्या संशयातून आपला भाऊ आणि वहिनीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. यामध्ये त्या व्यक्तीच्या पत्नीने देखील साथ दिली. याप्रकरणी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली असून याचा अधिक तपास करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एक महिला अचानक पोलीस ठाण्यात आली आणि तिने आपल्या पतीसह दोन जणांची हत्या केल्याचं म्हटलं आहे. तसेच घराजवळ मृतदेह ठेवल्याचं देखील पोलिसांना सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मधनु राम आणि गंगोत्री अशी हत्या झालेल्या लोकांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधमन भगत आपली पत्नी लुंदरी बाईसोबत डोभ येथे राहतो. त्याच्या शेजारीच त्याचा भाऊ मधनु राम ही राहतो.
कुऱ्हाडीने वार केल्यामुळे पती-पत्नीचा जागीच मृत्यू
शुक्रवारी रात्री बुधमन आपल्या भावाच्या घरी अचानक आला आणि काहीही न बोलता कुऱ्हाडीने त्यांची निर्घृण हत्या केली. याच दरम्यान हा प्रकार त्याच्या वहिनीने पाहिला आणि ती आरडाओरडा करत घराबाहेर आली. त्यावेळी आरोपीने तिलाही पकडलं आणि तिची देखील हत्या केली. कुऱ्हाडीने वार केल्यामुळे पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, भाऊ आणि वहिनी हे जादूटोणा करायचे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला धोका होता म्हणून हत्या केली.
दोन्ही कुटुंबामध्ये होता वाद
पोलिसांनी घर सील केलं असून दोन्हीही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गावकऱ्यांकडे देखील चौकशी केली. तेव्हा या दोन्ही कुटुंबामध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे. हे दोघे जादूटोण्याचं काम करत असायचे. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. त्यावेळी भाऊ आणि वहिनीनेच केलेल्या जादूटोण्याने मृत्यू झाल्याचा आरोपीला संशय होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.