संतापजनक! लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; नेत्याकडे नेलं अन्…
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 12:22 PM2022-05-10T12:22:28+5:302022-05-10T12:26:10+5:30
Crime News : आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथे ही संतापजनक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पीडितेने केलेल्या आरोपानुसार, तरुणी आपल्या लग्नाची पत्रिका वाटत असताना तिचं अपहरण करण्यात आलं. तीन जणांनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी तिला एका राजकीय नेत्याकडे नेलं आणि नंतर मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील गावात एका व्यक्तीसोबत राहण्यास भाग पाडलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे.
पीडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, "18 एप्रिलला लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेले असता गावातील तीन तरुणांनी अपहरण केलं. 21 एप्रिलला हे लग्न होणार होतं". तरुणीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि नंतर एका नेत्याकडे सोपवलं ज्याने काही दिवस आपल्याला झाशीत ठेवलं असा दावा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीची इच्छा नसतानाही तिला मध्य प्रदेशातील दातिया येथे एका व्यक्तीसोबत राहण्यासाठी पाठवलं.
तरुणीने आपल्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली आहे. तरुणीने अपहरण, बलात्कार आणि विक्री केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.