'तो' वाद ठरला जीवघेणा! पतीने जीन्स घालण्यास नकार दिला; संतापलेल्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 09:12 AM2022-07-20T09:12:29+5:302022-07-20T09:13:32+5:30
Crime News : पती-पत्नीत जीन्सवरून झालेल्या एका वादातून पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. थेट आपल्या पतीची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये विविध कारणांवरून वाद होत असतात. कधी कधी हे वाद टोकाला देखील जातात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. झारखंडमध्ये पती-पत्नीत जीन्सवरून झालेल्या एका वादातून पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. थेट आपल्या पतीची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ही घटना झारखंडच्या जामतारा येथील आहे. आंदोलन तुडू असे पतीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जोरभिटा गावात पत्नीला जीन्स घालण्यास विरोध पतीच्या जीवावर बेतलं आहे.. पतीने जीन्स घालण्यास विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने चाकू उचलला आणि पतीवर चाकूने वार करून पतीला जखमी केले. यानंतर जखमी पतीला धनबाद येथील पीएमसीएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी संध्याकाळी पत्नी पुष्पा हेमब्रम काही लोकांसोबत जीन्स घालून गोपालपूर गावात जत्रा पाहण्यासाठी गेली होती. पती आंदोलन तुडू याने पत्नीला जीन्स घातलेली पाहिल्यानंतर त्यावर आक्षेप घेतला. तसेच तुझे लग्न झाले आहे, आता तू जीन्स घालायची नाही, असे सांगितले. तीच गोष्ट पुष्पा हेमब्रमला खटकली आणि पुष्पाने विरोध करत पतीसोबत भांडण केले. यादरम्यान तिने रागाच्या भरात चाकू उचलला आणि नंतर चाकूने पतीवर वार केले.
आंदोलन तुडूचे वडील कर्णेश्वर तुडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाचे लग्न झाले होते. सुनेने जत्रा पाहून घरी परतल्यावर मुलगा आंदोलन तुडूने जीन्स घालण्यास नकार दिला होता, यामुळे त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी आरोपी पत्नी पुष्पा हिने आपला गुन्हा मान्य केला आहे. जामतारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अब्दुल रहमान यांनी सांगितले की, उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने धनबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.