भयंकर! चोरीच्या आरोपाखाली 'त्याला' पकडला पण 24 तासांत मृत्यू झाला; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 10:41 AM2021-11-17T10:41:44+5:302021-11-17T10:42:59+5:30
Crime News : पोलिसांनी पकडल्यानंतर केलेल्या अमानूष मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
नवी दिल्ली - कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे तरुणाने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या आरोपाखाली तरुणाला पकडण्यात आलं होतं पण त्यानंतर 24 तासांतच त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी पकडल्यानंतर केलेल्या अमानूष मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या असंख्य जखमी आपल्या भावाच्या शरीरावर दिसत असल्याचा दावा मृत तरुणाच्या बहिणीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरातील कल्लू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी संशयित म्हणून चोरीच्य़ा आरोपाखाली पकडलं होतं. त्या रात्री तरुणाला पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्यात आलं. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमधून कुटुंबीयांना फोन आला आणि तरुणाला घेऊन जायला सांगण्यात आलं.
तरुणाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा
तरुणाची तब्येत बरी नसून त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनी कुटुंबीयांना दिला. पण कुटुंबीय कल्लूला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. कल्लूच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा जागोजागी दिसत होत्या. तो या वेदना सहन करत होता. अखेर वेदना सहन न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
कल्लूचा मृत्यू हा पोलिसांनीच केलेली हत्या
कल्लूचा मृत्यू हा पोलिसांनीच केलेली हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कल्लूला पोलीस घेऊन गेले त्यावेळी त्याची तब्येत एकदम ठिक होती. असं असताना 24 तासांत असं काय घडलं की त्याचा मृत्यू व्हावा, असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेत दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.