धक्कादायक! 8 वर्षीय मुलाचे अपहरण करुन खून; 8 संशयितांना घेतले ताब्यात, नातेवाईकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:15 PM2022-04-18T22:15:52+5:302022-04-18T22:20:28+5:30
Crime News : अपहरण करण्यात आलेल्या आठ वर्षांच्या मुलाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासासाठी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पिंपरी : पिंपरी - चिंचवड शहरात मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर किरकोळ कारणांवरून खुनी हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांमध्ये चिखली येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी अपहरण करण्यात आलेल्या आठ वर्षांच्या मुलाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासासाठी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
ही घटना रविवारी (दि. १७) संध्याकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली. मुलाचा मृतदेह एका पडक्या पत्राशेडमध्ये आढळून आला. लक्ष्मण बाबुलाल देवासी (वय ८, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. मृतदेह हाती लागल्यानंतर २४ तासांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु अद्याप आरोपी पकडले गेले नाहीत. तसेच खुनामागचे कारण समजले नाही. परिणामी खून झालेल्या मुलाचे नातेवाईक संध्याकाळी चिखली पोलीस ठाण्यात आले होते. आरोपींना पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी कुटुंबीय मूळचे राजस्थानचे असून, हरगुडे वस्ती येथे वास्तव्यास आहे. त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. देवासी यांना तीन मुली आणि लक्ष्मण हा एकुलता एक मुलगा होता. तळवडे येथील सरस्वती विद्यालयात दुसरीच्या वर्गात लक्ष्मण शिक्षण घेत होता. लक्ष्मण रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातून बाहेर गेला. बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो न सापडल्याने लक्ष्मणचे अपहरण झाल्याची शंका व्यक्त करत नातेवाईकांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, शोध घेत असताना सायंकाळी सातच्या सुमारास लक्ष्मणचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या एका पडक्या पत्राशेडमध्ये आढळून आला. सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. ससून रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. मात्र, खुनाची घटना उघडकीस येऊन २४ तास उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाहीत. चिखली पोलिसांनी दिवसभरात आठ संशयितांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
आठ संशयितांना घेतले ताब्यात
या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आठ संशयितांना ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यांना समजून सांगण्यात आले आहे. तपास सुरू असून लवकर तपास करण्यावर भर आहे.
- आनंद भोईटे, पोलीस उपआयुक्त