Crime News: वाडा येथील विद्यार्थिनीचे अपहरण व सुटका, घटनेचा टीईटी परीक्षातील गैर प्रकाराशी संदर्भ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 10:27 PM2022-08-13T22:27:11+5:302022-08-13T22:28:23+5:30
Crime News: वाडा येथील एका शिक्षक दाम्पत्याच्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर वाडा पोलिसांनी जवळच लपविलेल्या आरोपीला अवघ्या बारा तासात पकडण्यात यश मिळविले असले तरी ह्या मागे शिक्षक पात्र परीक्षेतील(टिईटी) गैरव्यवहाराचा संबंध जोडला जात आहे.
- हितेंन नाईक
पालघर - वाडा येथील एका शिक्षक दाम्पत्याच्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर वाडा पोलिसांनी जवळच लपविलेल्या आरोपीला अवघ्या बारा तासात पकडण्यात यश मिळविले असले तरी ह्या मागे शिक्षक पात्र परीक्षेतील(टिईटी) गैरव्यवहाराचा संबंध जोडला जात असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत रात्री १२ वाजता वाडा पोलीस ठाण्यात कश्यासाठी आल्या होत्या?ह्यावर जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे.
वाडा शहरात अशोक वन परिसरात राहणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थीनीचे काल (12 ऑगस्ट रोजी) सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीतून आलेल्या तीन आरोपींनी अपहरण केल्याने एकच खळबळ उडाली होती.पोलिसांनी आपल्या टीम बनवून अनेक ठिकाणी सिसीटिव्ही फुटेज चा आधार घेत तपास केला असता वाडा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या ऐनशेत गावाजवळ आरोपीच्या एका शेतघराचा त्या विद्यार्थिनीची सुटका केली.याप्रकरणी आरोपी समीर ठाकरे ह्या क्लासेस घेणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला अटक केली आहे.
संध्याकाळी सात च्या दरम्यान हे प्रकरण घडल्या नंतर पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत ह्या रात्री ११ ते१२ च्या दरम्यान वाडा पोलीस स्थानकात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून जिल्ह्यातील एका शिक्षकाच्या मुलीचे अपहरण झाल्या नंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी वाडा पोलीस ठाण्यात जाण्या मागचे कारण मात्र अस्पष्ट आहे.ह्या बाबत शिक्षणाधिकारी भागवत ह्यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला पोलिसांनी चौकशी साठी बोलाविले होते का?असे विचारले असता मला चौकशी साठी पोलिसांनी बोलाविले नसल्याचे त्यांनी लोकमत ला सांगितले.मग रात्रीचे १२ वाजता त्यांनी वाडा पोलीस ठाण्यात जाण्या मागचे कारण काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ह्या अपहरण प्रकरणाचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा(टिईटी) मधील भ्रष्टाचाराचा थेट संबंध असून टिईटी परीक्षा उतिर्ण झालेला उमेदवारच शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरत असतो.ह्या टिई टी परीक्षेला बसलेल्या शेकडो उमेदवाराकडून लाखो रुपयांची रक्कम स्विकारण्यात आली असून त्याचा थेट संबंध जिप च्या शिक्षण विभागाशी जोडला जात आहे.त्यामुळे एका उच्च शिक्षित तरुणांनी एका मुलीचे केलेले अपहरण ही सत्य बाब असली तरी त्या मागचे खरे कारण शोधणे वाडा पोलिसांपुढे एक आव्हान ठरले आहे.कारण आरोपीने टिईटी च्या भ्रष्टाचाराचा अभ्यास करा सर्व सत्य बाहेर येईल अशी साद जिल्ह्यातील पत्रकारांना घातली असून हे अपहरण आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग ह्याचा कुठेतरी मोठा संबंध असल्याची दाट शक्यता वर्तवली जात असून शिक्षणाधिकाऱ्यांचे रात्री १२ वाजता वाडा पोलीस ठाण्यात जाणे ह्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.