लुटेरी दुल्हन! तरुणीने एक, दोन नव्हे तर तब्बल 30 लग्न केली; 'अशी' अडकवायची जाळ्यात अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:57 AM2022-05-13T10:57:28+5:302022-05-13T11:05:22+5:30
Crime News : रीना असं तरुणीचं नाव असून चौकशीत तिने 30 लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. एका तरुणीने एक, दोन नव्हे तर तब्बल 30 जणांसोबत लग्न करून फसवणूक केली आहे. पण अखेर तिचा फसवणुकीचा हा प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या नावाखाली 5 लाख घेऊन फरार झालेल्या या तरुणीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी तिला डुंगरपूर जिल्ह्यातील सागवाडा पोलिसांनी अटक केली आहे. रीना असं तरुणीचं नाव असून चौकशीत तिने 30 लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सीता चौधरी असं तिचं खरं नाव आहे. सागवाडा पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंह सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर 2021 ला जोधपुरा येथील रहिवासी प्रकाशचंद्र भट्ट यांनी एक तक्रार दाखल केली होती. भट्ट यांनी सांगितले की, जुलै 2021 मध्ये एजंट परेश जैन याने मध्यप्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी रीना ठाकूर सोबत त्याचे लग्न लावून दिले होते. याबदल्यात रमेश आणि रीनाने त्याच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते. लग्नानंतर 7 दिवस सासरी राहिल्यानंतर रीना त्याच्यासोबत जबलपूर येथे गेली. परत येताना रीनाने दुसऱ्या लोकांना सोबत घेऊन त्याला मारहाणही केली आणि आपल्या साथीदारांसह ती पळून गेली.
परेश जैन आणि रीनाने आपले फोन नंबरही बदलले तसेच त्याचे पैसेदेखील दिले नाही. पोलीस तपासादरम्यान असे आढळून आले की, रीना ठाकूरचे खरे नाव सीता चौधरी आहे. ती जबलपूर येथे गुड्डी उर्फ पूजा बर्मनच्या सोबत काम करते. गुड्डीने लुटारू नववधूंची टोळी चालवली आहे. तिने काही मुलींची बनावट नावं, पत्त्यासह आधारकार्ड आणि अन्य कागदपत्र तयार करुन ठेवले आहे. अनेक राज्यांमध्ये ती एजंटच्या माध्यमातून बनावट लग्न करवून त्यांच्यापासून पैसे आणि सोने, चांदीचे दागिने घेत होती. त्यानंतर ती फरार होत होती. सीता चौधरीदेखील अधिक काळापासून तिच्यासोबत राहत होती.
पोलिसांनी तपासादरम्यान, पूजा बर्मनचा नंबर काढला. यानंतर कॉन्स्टेबल भानुप्रतापने आपला फोटो पाठवून लग्न करण्याबाबत तिला सांगितले. लग्नासाठी मुलगी दाखवायला पाच हजार रुपये मागण्यात आले. त्यानंतर पूजाने कॉन्स्टेबलला 8 ते 10 मुलींचे फोटो पाठवले. त्यात रीनाचाही फोटोही होता. पोलिसांनी रीनाला लगेचच ओळखले. यानंतर एक सापळा रचत रीना पसंत असल्याचे सांगत तिच्यासोबत लग्न करण्याचे सांगितले.
पूजाने कॉन्स्टेबलला समदडिया मॉलजवळ एडव्हान्समध्ये 50 हजार रुपये घेण्याबाबत सांगितले. यानंतर कॉन्स्टेबल भानुप्रताप वर बनला आणि त्याच्यासोबत कॉन्स्टेबल भूपेंद्र सिंह आणि वीरेंद्र सिंह त्याचे मित्र बनून गेले. तिकडे पूजा रीना ठाकूरला घेऊन आली. तिथे तिने तिचे नाव काजल चौधरी असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांना इशारा मिळताच महिला पोलीस पथकही तिथे पोहोचले. यानंतर पोलिसांनी रीना चौधरी उर्फ सीता चौधरी उर्फ काजल चौधरी हिला अटक केली. आतापर्यंत तिने 30 लग्न केल्याचं सांगितलं. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.