अजब प्रेमाची गजब गोष्ट! प्रेमात वेडावलेल्या तरुणाने प्रेयसीचे नाक, कान कापले; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 03:08 PM2021-11-09T15:08:55+5:302021-11-09T15:16:26+5:30
Crime News : प्रेमात एका माथेफिरू प्रियकराने आपल्या प्रेयसीचं नाक आणि कान कापल्याची भयंकर घटना घडली आहे.
नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. कुटुंबीयांनी विरोध केला तर घर सोडून पळून जाऊन लग्न करतात. तर काही वेळा आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. बिहारमध्ये एका अजब प्रेमाची गजब गोष्ट आता समोर आली आहे. प्रेमात एका माथेफिरू प्रियकराने आपल्या प्रेयसीचं नाक आणि कान कापल्याची भयंकर घटना घडली आहे. कटिहार जिल्ह्यातील बरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कटिहारमध्ये राहणारी एक महिला रविवारी छठ पुजेच्या निमित्ताने गंगा स्नान करण्यासाठी गेली होती. या दरम्यान पौर्णिया नगर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशपूर येथील राहणारा प्रीतम कुमार तेथे पोहोचला आणि महिलेसोबत चुकीचे वर्तन करू लागला. यानंतर त्याने महिलेला मारहाण केली आणि तिचं नाक आणि कान कापलं. यानंतर तरुणाने आपण केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला. प्रीतमने रडत रडत सांगितलं की, तो आपल्या प्रेयसीला देवी मानतो. मात्र ही चूक कशी झाली हे माहीत नाही.
प्रीतम पुढे म्हणाला की, त्याला काहीच सांगायचं नाही. त्याला आपल्या प्रेयसीची बदनामी करायची नाही. तर दुसरीकडे पीडितेने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने पैसे घेतले होते आणि ते त्याला परत करायचे नव्हते. तो नेहमी पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत असतो. रविवारी तो आला आणि मारहाण करू लागला. याच दरम्यान तेथे असलेल्या लोकांनी महिलेला वाचवल्याचं तिने म्हटलं आहे.
रुग्णालयाचे डॉक्टर उदयन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साधारण 1.30 वाजता महिला आणि तरुणाला रुग्णालयात आणलं होतं. दोघेही जखमी झाले होते. महिलेचं नाक आणि कान कापलं होतं. पोलिसांनी पीडितेच्या प्राथमिक तक्रारीनंतर तरुणाला अटक केली आहे. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात महिलेने प्रेम संबंधाबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.