बापरे! 100 मजुरांना आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; आजार नसताना रुग्णालयात दाखल केलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 09:20 AM2022-02-09T09:20:18+5:302022-02-09T09:25:09+5:30
Crime News : तब्बल 100 मजुरांना मजुरी आणि जेवण देण्याचं आमिष दाखवत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
नवी दिल्ली - लखनऊच्या ठाकूरगंजमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. शहरातील तब्बल 100 मजुरांना मजुरी आणि जेवण देण्याचं आमिष दाखवत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण आपल्यासोबत काहीतरी भलतंच घडतंय याची जाणीव झाल्यानंतर मजूर संतापले. रुग्णालयात त्यांनी प्रचंड गोंधळ सुरू केला. त्यानंतर मेडिकल टीम तिथे दाखल झाली. पोलिसांना या गोंधळाची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून रेस्क्यू करुन सर्व मजुरांना तिथून बाहेर काढण्यात आलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी संबंधित मेडिकल कॉलेजविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच मेडिकल कॉलेजच्या हेडलाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना उघड झाल्यानंतर पीडित मजुरांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना याबाबतची माहिती दिली. एक व्यक्ती आमच्याकडे आला होता. त्याने आम्हाला जेवण आणि मजुरीचं आमिष दिलं होतं. त्याने आम्हाला रुग्णालयात बोलावलं. आम्ही त्या रुग्णालयात गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला जेवण दिलं. त्यानंतर आम्हाला त्यांनी रुग्णालयातील बेडवर झोपायला सांगितलं.
व्यक्तीने त्यानंतर आम्हाला डॉक्टर बघायला येतील, असं सांगितलं. त्यांनी आम्हाला फक्त बेडवर झोपायला सांगितलं होतं. पण थोड्यावेळाने आम्हाला इंजेक्शन दिलं गेलं. तसेच आमच्या हाताला सुई टोचली गेली, असं मजुरांनी सांगितलं. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, एमसी सक्सेना ग्रुप ऑफ कॉलेजमध्ये बनावट रुग्ण दाखल करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस अधिकारी सोमेन वर्मा यांनी या प्रकरणाविषयी माहिती दिली. संबंधित मेडिकल कॉलेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून मजूर आणले गेले होते.
मजुरांना 400 ते 500 रुपयांची मजुरी देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. यासोबतच जेवणही दिलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. संबंधित रुग्णालयात अवैध पद्धतीने उपचार सुरू होते. ज्या लोकांवर उपचार सुरू होता ते पूर्णपणे ठीक होते. याप्रकरणी रुग्णालयाचे डॉक्टकर शेखर सक्सेना याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. 'आजतक'ने याबाबतचे वृत्त दिलं आहे.