सांगलीत सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 09:32 PM2022-09-29T21:32:01+5:302022-09-29T21:32:53+5:30
प्रणितीचा विवाह वैभव पवार याच्यासोबत झाला होता. काही महिन्यांनी सासरच्या मंडळींनी विनाकारण प्रणितीला त्रास देण्यास सुरुवात केली.
शरद जाधव
सांगली - शहरातील अभयनगर येथे माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. प्रणिती वैभव पवार (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिची आई प्रमिला जयसिंग चव्हाण (रा. सोनी, ता. मिरज) यांनी सासरच्या लोकांविरोधात संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार प्रणितीचा पती वैभव बाळासाहेब पवार, सासू वैशाली बाळासाहेब पवार आणि सासरा बाळासाहेब दत्तात्रय पवार (मूळ रा. जाखापूर, ता. कवठेमहांकाळ, सध्या अभयनगर, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित बाळासाहेब पवार हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चालक म्हणून कार्यरत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत प्रणितीचा विवाह वैभव पवार याच्यासोबत झाला होता. काही महिन्यांनी सासरच्या मंडळींनी विनाकारण प्रणितीला त्रास देण्यास सुरुवात केली. घरबांधकामासाठी तिने माहेरहून दहा लाख रुपये आणावेत म्हणून त्यांनी तगादा लावला होता. चारित्र्याचा संशयावरूनही तिला मारहाण करण्यात येत होती. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रणितीने अखेर रविवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर प्रणितीच्या आईने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.