Crime News : हुंड्यासाठी विवाहितेला हातपाय बांधून जिवंत जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 09:14 AM2022-02-20T09:14:52+5:302022-02-20T09:15:10+5:30
हुंड्यासाठी विवाहितेला सासरकडील लोकांनी हातपाय बांधून जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारच्या नवादा जिल्ह्यात हुंड्यासाठी विवाहितेला सासरकडील लोकांनी हातपाय बांधून जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विवाहितेला जाळताना तिने ओरडू नये व तिचा आवाज घराबाहेर जाऊ नये, यासाठी तिच्या तोंडात कापड कोंबण्यात आले होते. कोमल असे तिचे नाव होते व कुकर फुटल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे तिच्या सासरकडील लोकांनी माहेरच्यांना सांगितले. हा प्रकार कळताच माहेरकडील लोक रुग्णालयात गेले असता, सासरकडील लोक तिच्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन फरार झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.
विवाहितेचा भाऊ राहुल याने सांगितले की, २०१९ मध्ये कोमलचा विवाह कृष्ण कुमार याच्याशी धुमधडाक्यात झाला होता. त्यावेळी हुंडाही देण्यात आला होता तरीही माहेरहून हुंडा आणण्यासाठी तिच्यावर दबाव होता. तिच्या नवऱ्याने स्कॉर्पिओ मागितली होती.
आम्ही नकार दिल्यावर तिला जबर मारहाण करण्यात आली होती. तिचा सासरा समस्तीपूरमध्ये पोलीस अधिकारी आहे. तो पोलीस वर्दीचा धाक दाखवून हुंड्याची मागणी करीत होता. कुकर फुटल्याने तिचा मृत्यू झाला नसून, तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या भावाने केला आहे.