Crime News: एमएमआरडीएची घरे विकणाऱ्यांना कोठडी, बोगस कागदपत्रांद्वारे केली विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 08:21 AM2022-01-30T08:21:38+5:302022-01-30T08:22:00+5:30
Crime News: या टोळीने आतापर्यंत १८ जणांना ते बाधित नसतानाही बोगस कागदपत्रांच्या आधारे घरे देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २५ लाख रुपये उकळल्याचे तपासात उघड झाले.
मुंब्रा : शिळफाटा परिसरातील एमएमआरडीएच्या घरांची बोगस कागदपत्रांद्वारे बाधित नसलेल्यांना विक्री करणे तसेच घरे भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त जगजीत सिंह यांनी नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजिद शेख आणि रईस काझी या दोन दलालांना अलीकडेच अटक केली. यामुळे आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली असून, न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या टोळीने आतापर्यंत १८ जणांना ते बाधित नसतानाही बोगस कागदपत्रांच्या आधारे घरे देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २५ लाख रुपये उकळल्याचे तपासात उघड झाले. अटक केलेल्यांमधील इमरान जुनेजा हा मास्टरमाइंड असून त्याच्याकडे बोगस लेटरहेड, बोगस स्टॅम्प, रूमच्या बोगस चाव्या आढळून आल्या होत्या. त्याने मुंबईतील गोवंडी, चेंबूर, मानखुर्द येथील एमएमआरडीएच्या इमारतींमध्ये घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आल्याची माहिती तपास पथकाचे प्रमुख अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे यांनी दिली.
दरम्यान, त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेणे सुरु असल्याचे सांगण्यात आले.