Crime News: हातावर काठी मरून मोबाईल चोरी, चौकडी जेरबंद, घरातून १८ मोबाईल जप्त
By मनीषा म्हात्रे | Published: October 7, 2022 03:17 PM2022-10-07T15:17:03+5:302022-10-07T15:18:05+5:30
Crime News: पादचाऱ्याच्या हातावर काठी मारून मोबाईल चोरी करणाऱ्या चौकडीला शिवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
- मनिषा म्हात्रे
मुंबई - पादचाऱ्याच्या हातावर काठी मारून मोबाईल चोरी करणाऱ्या चौकडीला शिवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अर्जुनकुमार इंद्रासन चौधरी (२१), अब्दुल वाहीद अब्दुल माजिद शहा (१९), वाहीदुर मबुल हुसेन चौधरी (१९), मोहम्मद हुसेन मोहम्मद इस्त्राईल शेख (१९) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्या घर झडतीतून १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
शिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी तक्रारदार हे सायंकाळी १८:५५ वाजताच्या सुमारास मोबाईल फोनवर बोलत पायी चालत जात असताना अचानक त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तीन इसमांनी हातावर काठी मारून त्यांच्या हातातील मोबाईल फोन खेचून घेऊन गेले. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला.
शिवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदार व साक्षीदार यांच्या मदतीने अर्जुनकुमार, अब्दुल यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना या दोन आरोपींना अटक केले. तसेच चोरी झालेल्या मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकावरून तसेच तांत्रिक मदतीच्याव्दारे कामाठीपुरा नागपाडा परिसरातून आणखी दोन आरोपींना अटक केली.
अटक आरोपींच्या घर झडतीत घरातून १८ वेगवेगळया कंपनींचे मोबाईल फोन व एक संगणक संच असे एकूण १ लाख ८९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौघांकडे अधिक तपास सुरु आहे.