Crime News: मुलाने गळफास घेतलेला पाहून आईने घेतली विहिरीत उडी, सेक्सटॉर्शनने बळी घेतल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 08:14 AM2022-09-03T08:14:33+5:302022-09-03T08:15:05+5:30
Crime News: सोशल मीडियावरून मैत्री करून ‘सेक्सटॉर्शन’चा बळी ठरलेल्या कान्द्रेभुरे (सफाळे) येथील शैलेश दिनेश पाटील (२६) याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे पाहिल्यावर दुःख अनावर झाल्याने त्याची आई कल्पना पाटील हिने जवळच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
- हितेन नाईक
पालघर : सोशल मीडियावरून मैत्री करून ‘सेक्सटॉर्शन’चा बळी ठरलेल्या कान्द्रेभुरे (सफाळे) येथील शैलेश दिनेश पाटील (२६) याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे पाहिल्यावर दुःख अनावर झाल्याने त्याची आई कल्पना पाटील हिने जवळच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील कान्द्रेभुरे (ब्राह्मणपाडा) गावातील शैलेशने गुरुवारी घराशेजारील शेतात जांभळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपला मुलगा घाईघाईत शेताच्या दिशेने गेल्याचे त्याच्या आईने पाहिले.
बराच वेळ झाला, तरी तो घरी परत न आल्याने त्याच्या आईने शेताच्या दिशेने धाव घेतली. त्याची शोधाशोध केल्यावर शेतातील जांभळाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेला त्याचा मृतदेह पाहून पाटील यांनी आक्रोश सुरू केला. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर त्यांना दुःख अनावर झाले आणि त्यांनी जवळच्या विहिरीत उडी घेतली.
घटनेची माहिती गावात कळल्यानंतर सर्वांनी शेताकडे धाव घेतली. घटनेची वाच्यता होऊ नये, यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी दोघांच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार केले. महत्त्वाचे म्हणजे, गावात राहणाऱ्या पोलीस पाटील अनिषा पाटील यांनी याबाबत केळवे सागरी पोलीस ठाण्याला कुठलीही माहिती दिली नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देत, नातेवाइकांशी चर्चा केली. मात्र, आमची कुणाविरोधात तक्रार नसून कुणावर संशय नसल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.
अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट...
- शैलेश पाटील याने फेसबुक अथवा व्हाॅट्सॲपवरून अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर शैलेशला ब्लॅकमेलिंग केले जात असावे व त्यातून शैलेशने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
- याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पाडवी म्हणाल्या, तरुणाचा मोबाइल ताब्यात घेत सायबर सेलच्या माध्यमातून तपास करू. लवकरच गुन्हा दाखल करू.