संतापजनक! 3 लाख आणि कार दिली नाही म्हणून पतीने फोनवरच दिला पत्नीला ट्रिपल तलाक अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 12:49 PM2022-04-03T12:49:10+5:302022-04-03T12:49:59+5:30
Crime News : हुंड्यात तीन लाख रुपये रोख आणि कारची मागणी पूर्ण न केल्याने पतीने मुंबईहून फोनवरून पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील महिलेला तिहेरी तलाक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हुंड्यात तीन लाख रुपये रोख आणि कारची मागणी पूर्ण न केल्याने पतीने मुंबईहून फोनवरून पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही तर या तरुणाने मुंबईतील एका हिंदू तरुणीशी लग्न केल्याचाही आरोप होत आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या 6 जणांवर अत्याचार आणि तिहेरी तलाकच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
फतेहपूरच्या गाझीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शाखा गावामध्ये ही महिला राहते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, गाझीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शाखा गावातील रहिवासी शरीफ खान यांची मुलगी रुक्सार हिचा निकाह 5 डिसेंबर 2018 रोजी गावातीलच रहिवासी रमजान खानसोबत झाला होता. रमजान मुंबईच्या शिवाजी नगरमध्ये कुटुंबासह राहतो. त्यानंतर पती, सासरा इदरिश खान, सासू सलमा, नणंद मुस्कान हे हुंड्याबाबत समाधानी नव्हते असा आरोप तिने केला आहे.
सासरच्यांनी हुंड्यात तीन लाख रुपये रोख आणि कारची मागणी केली होती. मात्र रुक्सारच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने ते हुंड्याची मागणी पूर्ण करू शकले नाहीत. या पीडित महिलेची अशी तक्रार आहे की, हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने नाराज झालेल्या तिच्या सासरच्या व्यक्तींनी महिलेला मारहाण करून तिचा छळ केला. गर्भवती असताना तिला घराबाहेर काढण्यात आलं अशी तक्रार रुक्सारने केली आहे. यानंतर ती तिच्या माहेरी निघून गेली. ही पीडित महिला एका मुलाची आई आहे.
रुक्सारच्या पतीने तिला फोनवर तिहेरी तलाक देऊन मुंबईतीलच रितू नावाच्या हिंदू मुलीशी लग्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिला रुक्सारच्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम 498-A, 323, 504, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 चे कलम 3, 4 आणि मुस्लिम महिला विवाह कायदा, 2019 मधील कलम 3, 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.