Crime News: शेजारचे दुकान भाड्याने घेतले, भिंतीला भगदाड पाडले अन् एक किलोहून अधिकचे दागिने लांबवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:58 PM2022-03-25T23:58:19+5:302022-03-25T23:58:39+5:30
Crime News: वारजे येथे सराफ दुकानाच्या शेजारचे दुकान भाड्याने घेऊन दोन्ही दुकानाच्या मधील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांच्या दागिन्यांची लुट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे - वारजे येथे सराफ दुकानाच्या शेजारचे दुकान भाड्याने घेऊन दोन्ही दुकानाच्या मधील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांच्या दागिन्यांची लुट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना वारजे इंडिया रोडवरील लक्ष्मी माथा येथील माऊली ज्वेलर्स या सराफ दुकानात शुक्रवारी दुपारी दोन ते पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे एक किलो पेक्षा अधिक सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा संशय आहे. दुकानातून किती किंमतीचा ऐवज चोरीला गेला याची माेजदाद उशिरापर्यंत सुरु होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी माऊली ज्वेलर्स यांच्या दुकानाशेजारील दुकान मसाल्याच्या व्यवसायासाठी भाड्याने घेतले होते. त्या दुकानात फर्निचरचे काम सुरु होते. नवी दुकान टाकायचे असल्यामुळे काम सुरु असल्याने चोरट्यांचा संशय आला नाही. शुक्रवारी दुपारी माऊली ज्वेलर्स हे दुकान बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी काम सुरू असल्याचा बहाणा करून दोन दुकानाच्या मध्ये असलेल्या भिंतीला भलेमोठे भगदाड पाडले. तेथून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.
ज्वेलर्सचे मालक सायंकाळी दुकान उघडण्यासाठी परत आले तेव्हा त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, गुन्हे शाखेची पथक व स्थानिक पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन आरोपींचा शोध सुरु केला आहे. एक किलो पेक्षा अधिक किमतीचे दागिने दुकानातून चोरी केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे.