मंत्र्याच्या मुलाची गुंडगिरी! बागेत खेळणाऱ्या मुलांना मारहाण करत गोळीबार; अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:38 PM2022-01-24T12:38:22+5:302022-01-24T12:39:57+5:30
Crime News : नारायण प्रसाद यांचा मुलगा बबलू यांने दादागिरी केली आहे. बागेत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना मारहाण करत गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली - बिहारमध्ये एका मंत्र्याच्या मुलाची गुंडगिरी पाहायला मिळाली आहे. बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौतनचे भाजपा आमदार आणि बिहार सरकारचे पर्यटन मंत्री नारायण प्रसाद यांचा मुलगा बबलू यांने दादागिरी केली आहे. बागेत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना मारहाण करत गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्री नारायण प्रसाद यांच्या मुलाने धमकावत हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये लहान मुलासह अनेक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या परिसरातील हरदिया या गावात हा संतापजनक प्रकार घडला. गावातील काही मुलं ही बागेत खेळत होती. त्याच दरम्यान बबलू हा मंत्री असलेल्या वडिलांच्या शासकीय वाहनातून आला होता. मंत्र्यांचा मुलगा आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी मुलांना मारहाण करत हवेत गोळीबार केला. मारहाणीत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल
ग्रामस्थांनी मंत्र्यांचे ते वाहन ताब्यात घेतले. लोकांनी मंत्र्यांच्या वाहनावरील नेम प्लेट तोडून त्यांच्या वाहनाला घेराव घालून जोरदार निदर्शने केली. यानंतर मंत्र्यांचा मुलगा आणि इतर लोक घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये लोक पळताना दिसत आहेत. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंत्र्यांचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांचा पाठलाग सुरू केला. पण ते गाडी सोडून पळून गेले.
गावामध्ये तणावाचं वातावरण
मंत्री नारायण प्रसाद कठैया हे विष्णुपुरवा येथील रहिवासी आहेत. गोळीबार झाल्याची माहिती मंत्र्यांनी नाकारली आहे. त्यांनी असं काहीच घडलं नसल्याचं म्हटलं आहे. माझ्या मुलावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. हे एक राजकीय षडयंत्र आहे असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून गावामध्ये तणावाचं वातावरण असल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.