Crime News: विजेच्या टॉवरवरील तारांची चोरी करताना लागला गळफास, एकाचा मृत्यू, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 05:15 PM2022-03-06T17:15:34+5:302022-03-06T17:16:05+5:30
Crime News: उच्चदाब विद्युत वाहिनी टॉवरवरील विजेच्या तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला.
अहमदनगर - उच्चदाब विद्युत वाहिनी टॉवरवरील विजेच्या तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला. योगेश रावसाहेब विघे ( वय २० वर्ष, रा. पिलानीवस्ती चिकलठाण ता . राहुरी ) असे मयताचे नाव आहे.
यासंदर्भात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एक विधीसंघर्षीत बालकाचाही समावेश आहे. इनोव्हा कारसह (क्र.एम.एच.२०ए.जी.५२५८ ) पोलीसांनी टेम्पोही (क्र.एम.एच.१७ बी.डी.०२९७ ) जप्त केला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात रविवारी (दि.६)पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. विशाल राजेंद्र पंडीत (वय १८) , आदित्य अनिल सोनवणे (वय २०) दोघेही रा. शिंदोडी ता. संगमनेर , संकेत सुभाष दातीर ( वय २६, रा. प्रिंप्रिलौकी ता.संगमनेर ) व सरफराज इक्बाल शेख (रा. रामगड ता. श्रीरामपुर) व एक विधीसंघर्षीत बालक अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की , योगेश रावसाहेब विघे यास विशाल आणि आदित्य हे शिंदोडी येथे घेऊन आले. या सर्वांनी पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान शिंदोंडी शिवारात उच्चदाब विद्युत वाहून नेणाऱ्या टॉवरवर टॉवरची उंची जास्त आहे असे माहिती असताना देखील योगेश विघे यास चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने विजेच्या टॉवरवर चढवले. त्यास टॉवरवरील अॅल्युमिनियम धातुच्या विजेच्या तारा कापण्यास सांगितले . त्याच्याकडून तारा कापून घेतल्या आणि त्याच दरम्यान तारा कापत असताना तार तुटतेवेळी योगेश याच्या पोटास बांधलेल्या दोरीने गळफास बसल्याने योगेशची हालचाल पूर्ण बंद झाली.
त्यानंतर वरील पाच जणांनी इन्होवा कारमधून योगेशला औषध उपचारासाठी लोणी येथील पी.एम.टी हॉस्पीटल मध्ये नेत असताना लोणी पोलिसांना वाहनाचा संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली. योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले . याप्रकरणी रावसाहेब सुखदेव विघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी चौघांसह एका विधीसंघर्षीत बालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत .