Crime News : फोंडाघाटात कार जळून एकाचा मृत्यू, तर्कवितर्कांना उधाण; नेमके कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:49 PM2022-03-10T22:49:57+5:302022-03-10T22:52:05+5:30
Crime News: कणकवली तालुक्यातील फोंडाघाटातील अवघड वळणावर मारुती इर्टिका कार जळून बेचिराख झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. ही कार कणकवली शहराजवळील गावातील एका उद्योजक व्यक्तीची असल्याची जोरदार चर्चा आहे.
कणकवली - कणकवली तालुक्यातील फोंडाघाटातील अवघड वळणावर मारुती इर्टिका कार जळून बेचिराख झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. ही कार कणकवली शहराजवळील गावातील एका उद्योजक व्यक्तीची असल्याची जोरदार चर्चा आहे. तर या कारमध्ये असलेली एक व्यक्ती देखील आगीत होरपळून पूर्णतः जळाली असून ती नेमकी कोण ? याबाबत पोलिस तपास करीत आहेत. घटनास्थळावरून तसेच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या त्या कारमध्ये जळलेल्या भागात मानवी बरगड्या सदृश्य काही भाग दिसत आहे.मात्र, व्यक्तीची ओळख पटण्यासारखे काही साहित्य सापडलेले नाही.
या घटनेबाबत माहिती समजताच फोंडाघाट दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे ,महामार्ग पोलीस तसेच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यावर पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर हुंदळेकर , उपनिरीक्षक शरद देठे,मंगेश बावधने तसेच पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. घटनेबाबत विविध शक्यता पोलीस पडताळून पहात आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत घटनेबाबत ठोस माहिती हाती आली नव्हती. दरम्यान, फोंडाघाटातील ती घटना अपघात की घातपात ? याबाबत आता नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तर जळालेल्या चार चाकीवर ( एम.एच. ०७ ए. जी.६२९७) असा क्रमांक आहे. त्यामुळे त्या क्रमांकावरून गाडी मालकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते. पण गाडीमालकाचा फोन लागत नसल्याने त्याबाबतची माहिती समजलेली नाही. तसेच त्या गाडीतील व्यक्ती कोण होती ? याबाबत तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फोंडाघाट येथे कार जळाल्याची माहिती समजताच वागदे माजी सरपंच संदीप रमाकांत सावंत,नगरसेवक अण्णा कोदे, समीर प्रभुगावकर,कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, फोंडा सरपंच संतोष आंग्रे,नगरसेवक संजय कामतेकर,लल्लू ताम्हाणेकर,गौरव मुंज, वैभव काणेकर,नगरसेवक कन्हैया पारकर,मधुकर पारकर यांच्यासह कणकवली,वागदे गावातील व फोंडाघाट ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहचले होते.