महिला डॉक्टर आणि तरुणाला ऑनलाईन गंडा, मेंबरशीप, टीव्ही बुकींग करणे महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 06:50 PM2020-08-16T18:50:57+5:302020-08-16T18:54:42+5:30
याप्रकरणी अनुक्रमे एमआयडीसी व रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव - ऑनलाईन व्यवहार करणे महिला डॉक्टर व एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कुरीयर कंपनीच्या आॅनलाईन मेंबरशीपसाठी सायका फारुख शेख (२६, रा.मेहरुण) या महिला डॉक्टरची १६ हजार ९०० रुपयात तर आॅनलाईन टी.व्ही.बुकींगची चौकशी करण्यासाठी मिलिंद अशोक वानखेडे (रा.मुकुंद नगर, हरिविठ्ठल नगराजवळ) या तरुणाचा मोबाईल हॅक करुन ३९ हजार २८८ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनुक्रमे एमआयडीसी व रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
महिला डॉक्टरची १७ हजारात ऑनलाईन फसवणूक
जळगाव : कुरीयर कंपनीच्या आॅनलाईन मेंबरशीपसाठी पाठविलेल्या ओटीपी क्रमांक विचारुन सायका फारुख शेख (२६, रा.मेहरुण) या महिला डॉक्टरची १६ हजार ९०० रुपयात आॅनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी १५ आॅगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, डॉ.सायका शेख यांचे मेहरुणमध्ये क्लिनिक आहे. ७ आॅगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता त्यांनी मोबाईवरुन डीटीडीसी कुरीअर कंपनीच्या आॅनलाईन मेंबरशिपसाठी आॅनलाईन फार्म भरला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना मोबाईलवर फोन आला. तुमची डीटीडीसी कुरियरची मेंबरशिप पूर्ण झाली असून मेंबरशिपचा ओटीपी तुमच्या मोबाईलवर पाठविला आहे, तो क्रमांक सांगा. असे म्हटल्यावर डॉ. सायका शेख यांनी चार अंकी ओटीपी क्रमांक दिला. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना ९ हजार ९९९ आणि ७ हजार रुपये असे एकूण १६ हजार ९९९ रुपये बँकेच्या खात्यातून कमी झाल्याचा संदेश आला. याबाबत त्यांनी तत्काळ फोन आलेल्या क्रमाकांवर संपर्क केला असता पैश्यांबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आठवडाभरानंतर डॉ. सायका शेख यांच्या फिर्यादीवरुन १५ आॅगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
मोबाईल हॅक करुन ३९ हजाराचा ऑनलाईन गंडा
आॅनलाईन टी.व्ही बुकींग केल्यानंतर निर्धारित तारखेला टी.व्ही.न मिळाल्याने त्याची चौकशी करण्यासाठी परत आॅनलाईन साईडवर गेलेल्या मिलिंद अशोक वानखेडे (रा.मुकुंद नगर, हरिविठ्ठल नगराजवळ) या तरुणाचा मोबाईल हॅक करुन त्यांच्या बॅँक खात्यातून दोन वेळा ३९ हजार २८८ रुपये आॅनलाईन वळविण्यात आल्याचा प्रकार १४ आॅगस्ट रोजी घडला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
मिलिंद वानखेडे हे खासगी कंपनीत नोकरी करतात. ८ आॅगस्ट रोजी दुपारी त्यांनी आॅनलाईन टी.व्ही. बुकींग केला.त्यासाठी २६ हजार ४३३ रुपये त्यांनी आॅनलाईनच भरले. १३ आॅगस्टपर्यंत टी.व्ही. घरपोच मिळणे अपेक्षित होते, मात्र मिळाला नाही, त्यामुळे वानखेडे यांनी १४ रोजी इंटरनेटचा वापर करुन संबंधित फर्मचा संपर्क क्रमांक शोधून त्यावर संपर्क साधला. त्या व्यक्तीनेही वानखेडे यांना मी तुमची अडचण दूर करतो, त्यासाठी आॅनलाईन ११ रुपये भरायला लावले व त्यानंतर मोबाईलवर एक अॅप डाऊनलोड करायला लावले. ही प्रक्रिया केल्यानंतर वानखेडे यांचा मोबाईल हॅक करुन समोरील व्यक्तीने २६ हजार ६५० व दुसºया टप्प्यात १२ हजार ६३८ असे एकूण ३९ हजार २८८ रुपये आॅनलाईन वळविले.तिसºया वेळेस व्यवहार होण्यापूर्वी त्याच वेळी वानखेडे यांना बॅँकेतून फोन आला व हा व्यवहार तुम्ही स्वत: करीत आहात का? अशी विचारणा केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याचे वानखेडे यांनी बॅँकेला कळवून तातडीने क्रेडीट कार्ड ब्लॉक केले.