धक्कादायक! ऑनलाईन ऑर्डर देणं भोवलं; कंत्राटदाराला तब्बल २.६५ लाखांना गंडवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 05:06 PM2022-06-04T17:06:49+5:302022-06-04T17:11:06+5:30

Crime News : कंत्राटदाराने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार गिरड पोलिसात दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. 

crime News online fraud ordering cement of 2.65 lakh in wardha | धक्कादायक! ऑनलाईन ऑर्डर देणं भोवलं; कंत्राटदाराला तब्बल २.६५ लाखांना गंडवलं

धक्कादायक! ऑनलाईन ऑर्डर देणं भोवलं; कंत्राटदाराला तब्बल २.६५ लाखांना गंडवलं

Next

वर्धा : गुगल मॅपवरुन सिमेंट कंपनीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यावरुन सिमेंट बॅगांचा ऑर्डर देणे कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले असून सिमेंट कंपनीचे बनावट पेज तयार करुन कंत्राटदाराला तब्बल २ लाख ६५ हजारांना गंडवल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी कंत्राटदाराने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार गिरड पोलिसात दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. 

राकेश राजेश बोबडे रा. गिरड हा कंत्राटदार असून तो गुगलमॅपवर लोकेशन सर्च करीत असताना एका सिमेंट कंपनीचा मोबाईल क्रमांक मिळाला. कंत्राटदार राकेश याने मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन सिमेंटबद्दल संपूर्ण माहिती घेतली. भामट्याने कंपनीचे सगळे डॉक्यूमेंट त्याच्या ई मेलवरही पाठविले. त्यामुळे राकेशला विश्वास बसल्याने सिमेंटचे कोटेशन अतिशय कमी दिसल्याने त्याने रजिस्ट्रेशन करुन २ लाख ६५ हजार रुपये बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतून ट्रान्सफर केले. 

राकेशने कंपनीच्या अधिकाऱ्याला सिमेंटचा ट्रक किती तारखेला येईल, अशी विचारणा केली असता ट्रक १४ मे रोजी दुपारी १ वाजेपर्यंत येणार असल्याचे सांगितले. काही दिवसांनी पुन्हा माहिती घेतली असता त्यांनी तुमचा सिमेंटचा ट्रक निघाला आहे असे सांगितले. पण, ट्रक न आल्याने राकेशने सिमेंट कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक शोधून त्यावर संपर्क केला असता सिमेंट कंपनीच्या वर्धा जिल्ह्यातील डिलरचा क्रमांक त्यांनी दिला. त्यांच्याशी संपर्क केला असता कंपनीचे डॉक्युमेन्ट्स बरोबर आहे पण, त्यातील अकाउंट नंबर कंपनीचा नसल्याचे त्यांनी सांगितले.

राकेशने हिंगणघाट येथील बँकेत जात ज्या खात्यावर रक्कम पाठविले त्या खात्याची माहिती घेतली असता ते अकाउंट सिमेंट कंपनीच्या नावावर नसल्याचे समजले. अखेर राकेशला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट गिरड पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
 

Web Title: crime News online fraud ordering cement of 2.65 lakh in wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.