Crime News: मुलीची छेड काढायचा सराईत गुन्हेगार, संतापलेल्या आईने दांडक्याने मारून त्याला केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 02:50 PM2021-12-15T14:50:15+5:302021-12-15T14:50:45+5:30
Crime News: छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यामध्ये एका तरुणीची छेड काढणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुलीने आणि तिच्या आईने ठार मारल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी माय-लेकीला अटक केली आहे.
रायपूर - छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यामध्ये एका तरुणीची छेड काढणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुलीने आणि तिच्या आईने ठार मारल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी माय-लेकीला अटक केली आहे. तसेच दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलीस परिस्थिती न्यायालयासमोर मांडणार आहेत. तसेच पोलिसांकडून संबंधित माय-लेकींना कोर्टामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोरबाच्या एसपींनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
माय-लेकींनी ठार मारलेला सराईत गुन्हेगार हा त्यांचा नातेवाईक होता. तसेच पत्नी त्याला सोडून मित्रासोबत पळून गेल्यापासून मुलीचे लैंगिक शोषण करत होता. दरम्यान, डोक्यावर घाव आणि जखमा असलेला त्याचा मृतदेह रस्त्याच्या शेजारी सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी कुत्र्यांच्या मदतीने आरोपी माय-लेकीला शोधून काढले होते. त्यानंतर त्यांनी सदर गुन्हेगाराकडून त्यांना देण्यात येत असलेल्या त्रासाचा पाढा वाचत गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी सांगितले की, गेल्या सोमवारी रात्री सदर इसम मद्यधुंद अवस्थेत माय-लेकींच्या घरी गेला. तसेच त्याने सदर तरुणीला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. पत्नीने दिलेल्या घटस्फोटासाठी तो तिला जबाबदार ठरवत होता. त्यानंतर त्याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, कोरबाचे एसपी भोजराम पटेल यांनी सांगितले की, या कुटुंबाने मदतीसाठी डायल ११२ वर कॉल केला. त्यामुळे गुन्हेगार घाबरला. जेव्हा गस्ती पथक पोहोचले, तोपर्यंत तो गायब झाला होता. तेव्हा पोलिस कौटुंबिक वाद समजून तिथून माघारी परतले. मात्र तो रात्री पुन्हा आला आणि अश्लील इशारे करू लागला. तेव्हा संतापलेल्या माय-लेकींनी दांडका घेऊन त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर तो रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडला होता. मात्र तो मरेल असे कुणाला वाटले नव्हते. आता सदर मायलेकीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र पोलीस मृत व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता या हत्येमागे आत्मसंरक्षण असल्याची माहिती कोर्टात देणार आहेत.