Crime News : फसवणुकीच्या गुन्ह्यात पाकिस्तानी चोरटे सक्रिय, आभासी चलनात परताव्याचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 09:30 AM2022-01-31T09:30:30+5:302022-01-31T09:30:50+5:30
Crime News: बिटकाॅइनसह वेगवेगळ्या आभासी चलनांमध्ये सध्या गुंतवणूक वाढली आहे. या चलनांमध्ये गुंतवणुकीवर मोठा फायदा असल्याचे सांगितले जात असल्याने त्याच्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे.
- विवेक भुसे
पुणे : बिटकाॅइनसह वेगवेगळ्या आभासी चलनांमध्ये सध्या गुंतवणूक वाढली आहे. या चलनांमध्ये गुंतवणुकीवर मोठा फायदा असल्याचे सांगितले जात असल्याने त्याच्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे. मात्र, त्याचवेळी जादा परतावा देण्याच्या आमिषाने चलन विकून देतो, असे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे त्यात आता पाकिस्तानी सायबर चोरटेही सक्रिय झाल्याचे सायबर पोलिसांच्या तपासांत निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांकडे अशा दररोज आठ ते दहा तक्रारी येऊ लागल्या आहेत.
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले की हे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असतात. ज्या बँक खात्यात पैसे घेतात, त्या आधारे तपास करण्यात येत आहे. आम्ही केलेल्या तपासांत दोन ठिकाणी प्रथमच पाकिस्तानी आयपी ॲड्रेस आढळून आले आहेत. आभासी चलनाला भारतात अजून अधिकृत मान्यता देण्यात आली नाही. असे असले तरी आता त्याचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार होऊ लागला आहे. अनेक भारतीय आभासी चलनही बाजारात आले आहेत.
यातील बहुतांश व्यवहार हे इंस्ट्राग्रॉम, फेसबुकद्वारे होत असतात. सायबर चोरटे सोशल मीडियाद्वारे लोकांशी संपर्क साधतात. वेगवेगळ्या ॲपद्वारे बिटकाॅइन, एम कॅप, इथर, इथोरिअम अशा आभासी चलनात दररोज वाढ होत असल्याचे दर्शवितात. आभासी चलनाचा चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून हे चलन खरेदी करतात. मात्र, एकदा त्यांच्या खात्यावरून हे चलन घेतले की त्यांचा परतावा परत देत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने नायजेरियन सायबर चोरट्यांचा समावेश आहे.
दहा हजारांचे एक लाख करून देण्याचे आमिष
आभासी चलनात दहा हजार रुपये गुंतविल्यास एक-दोन महिन्यांत एक लाख रुपयांपर्यंत त्यांची किंमत वाढू शकते, असे सांगितले जाते. त्यांना ॲपवर गुंतवणूक करायला भाग पाडले जाते. त्यानंतर ते ॲप बंद होते.