Crime News: आयुषी हत्याप्रकरणी आई-वडिलांना अटक, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 05:40 PM2022-11-21T17:40:24+5:302022-11-21T17:42:31+5:30
Crime News: याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे. तसेच, मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केल्याने वडिलांना राग अनावर होता, हेही तपासात पुढे आले.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या जवळील मथुरातील मर्डर मिस्ट्रीचा उलगडा झाला आहे. येथील एका सुटकेस ट्रॉलीत सापडलेल्या मुलीच्या मृतदेहामुळे खळबळ माजली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला तेव्हा त्यातून ऑनर किलिंगचं प्रकरण उघड झालं. दिल्लीतील बदरपूर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीनं स्वत:च्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह लाल रंगाच्या बॅगेत भरून मथुराला फेकून दिले. वडिलानेच गोळी मारून आयुषी यादवची हत्या केल्याचं समोर आले आहे. आता, याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे. तसेच, मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केल्याने वडिलांना राग अनावर होता, हेही तपासात पुढे आले.
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, २२ वर्षाची आयुषी घरातून न सांगता बाहेर गेली होती. १७ नोव्हेंबरला जेव्हा ती घरी पोहचली तेव्हा वडील नितेश यादव यांनी तिला जाब विचारला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा संतापलेल्या वडिलांनी गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर रात्री वडिलांनी मुलीचा मृतदेह लाल रंगाच्या सुटकेसमध्ये भरून यमुना एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस रोडवरील राया परिसरात फेकून दिला होता.
महाराष्ट्रातील श्रद्धा हत्याकांड ताजं असतानाच दिल्लीतही तरुणीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली. आता, या आयुषी ह्त्याकांडातील गुढ समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली असून आपल्या मुलीने न सांगताच दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्यामुळेच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. तर, मुलगी अनेक दिवसांपासून घरातून गायब राहत होती, असेही दुसरे कारण पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी आयुषी मर्डर मिस्टीच्या तपासात तब्बल २० हजार मोबाईल फोन ट्रेस केले आहेत. या मोबाईलचे लोकेशनही तपास पथकाने शोधून काढले. जेवर, जाबरा टोल, खंदौली टोलसह हाथरस, अलीगढ़ आणि मथुरा मार्गावरील २१० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यानंतर, आई-वडिलांची कसून चौकशी केली असताना ऑनर किलींगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.