हत्तीच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती करणाऱ्या अख्तर इमाम यांची हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या 8 गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 04:03 PM2021-11-04T16:03:04+5:302021-11-04T16:18:30+5:30
Crime News : अख्तर इमाम यांच्या पाठीत एकामागोमाग एक अशा एकूण आठ गोळ्या झाडण्यात आल्या आहे.
नवी दिल्ली - हत्तीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती करणाऱ्या अख्तर इमाम (Elephant Man Akhtar Imam) यांची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर 8 गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना बिहारमधील दानापूरच्या फुलवारीशरीफ परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अख्तर इमाम यांच्या पाठीत एकामागोमाग एक अशा एकूण आठ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कौटुंबिक जमिनीच्या वादातून अख्तर इमाम यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अख्तर इमाम यांनी आपल्या हत्तींच्या नावावर जवळपास 5 कोटींची संपत्ती केली आहे. आपल्या हत्तींच्या नावावर संपत्ती केल्याने अख्तर इमाम हे चर्चेत आले होते. बुधवारी ते आपल्या हत्तींसाठी बांधण्यात आलेल्या शेडमध्ये काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी एकामागे एक अशा एकूण 8 गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. या हल्ल्यात अख्तर इमाम गंभीर जखमी झाले होते त्यांना स्थानिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अख्तर यांना सर्व लोक हाथी काका या नावानंच ओळखायचे. अख्तर यांनी आपल्या मुलाला जमीन आणि संपत्तीतून बेदखल केलं. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपली सगळी संपत्ती आपल्याकडे असणाऱ्या दोन हत्तींच्या नावावर केली होती. मुलाला बेदखल करुन आता नऊ महिने झाले आहेत, मात्र अख्तर यांना कधीच एकटं असल्यासारखं वाटत नाही. कारण मुलापेक्षा त्यांचा हत्तींवर जास्त विश्वास आहे. याच कारणामुळं लोक त्यांना हाथी काका म्हणतात असं म्हटलं होतं.
मुलाला बेदखल करत हत्तींच्या नावावर केली तब्बल 5 कोटींची संपत्ती
अख्तर यांच्याकडे दोन हत्ती आहेत. एकाचं नाव राणी तर दुसऱ्याचं नाव मोती आहे. अख्तर यांचा संपूर्ण दिवस याच दोघांसोबत जातो. आपली पाच कोटींची जमीन हत्तींच्या नावावर केल्यानंतर अख्तर लोकप्रिय झाले. आपल्या संपत्तीचं विभाजन हाथी काकांनी दोन भागात केलं होतं. पहिला हिस्सा त्यांनी पत्नीच्या नावावर केला होता. तर दुसऱ्या हिस्सा हत्तींच्या नावावर केला होता. जर उद्या मी राहिलो नाही तर माझं घर, बँक बॅलन्स, जमीन आणि सगळी संपत्ती हत्तींची होईल. हत्तींना काही झाल्यास त्यांच्या वाट्याची संपत्ती ऐरावत संस्थेला मिळेल असं काकांनी म्हटलं होतं.