धक्कादायक! लेकीच्या हत्येसाठी वडिलांना जेलमध्ये टाकलं पण 3 वर्षांनी 'ती' अचानक परत आली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:27 AM2021-11-03T10:27:15+5:302021-11-03T10:28:30+5:30
Crime News : मुलीच्या हत्येच्या आरोपासाठी पोलिसांनी तिच्या वडिलांनाच जेलमध्ये टाकलं होतं.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या हत्येच्या आरोपासाठी पोलिसांनी तिच्या वडिलांनाच जेलमध्ये टाकलं होतं. मात्र आता तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर मुलगीच समोर आल्यामुळे वडिलांची सुटका झाली आहे. मुलीच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली एका व्यक्तीला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आरोपींनी पोलिसांशी संगनमत करून मुलीच्या वडिलांना फसवल्याचं या घटनेतून समोर आलं आहे. त्यामुळे या पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मेरापूरच्या देव सैनी गावात हा प्रकार घडला आहे. 2016 मध्ये 61 वर्षीय लालाराम यांची मुलगी सोनी अचानक गायब झाली होती. मुलगी घरी न आल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली. मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. वारंवार पोलीस ठाण्यात खेटे घालूनही मुलीचा काहीच थांगपत्ता लालाराम यांना मिळू शकला नाही. लालाराम यांनी नोंदवलेल्या तक्रारीत गावातील 3 तरुणांवर संशय व्यक्त केला होता. पण पोलिसांनी या संशयितांवर कोणतीच कारवाई केली नाही.
प्रकरण निकाली काढण्यासाठी मुलीच्या वडिलांनाच बनवले आरोपी
पोलिसांनी हे प्रकरण निकाली काढण्यासाठी मुलीच्या वडिलांनाच आरोपी बनवले आणि त्यांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याचं भासवलं. आपल्याला मारहाण करून जबरदस्तीने मुलीच्या हत्येची जबाबदारी घ्यायला भाग पाडलं, असा दावा आता मुलीच्या वडिलांनी न्यायालयात केला आहे. आरोपीच्या साथीने खोटे पुरावे सादर करत लालाराम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. काही दिवसांपूर्वी ज्या मुलीच्या हत्येचा आरोप लालाराम यांच्यावर आहे, ती मुलगीच समोर आली.
मुलीने आपण जिवंत असल्याचं सांगितलं
मुलीने पोलीस अधीक्षकांना आपण जिवंत असल्याचं सांगितलं. तसेच काही वर्षांपूर्वी आपल्या मर्जीने आपण घर सोडून गेल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर पोलिसांच्या तपासावर गंभीर आक्षेप घेत न्यायालयाने लालाराम यांनी सुटका केली आहे. पोलिसांनीच केलेल्या खोट्या कारवाईमुळे एका व्यक्तीला विनाकारण 3 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागल्यामुळे सर्वसामान्यांमधून पोलिसांबद्दल संताप व्यक्त होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.