स्वप्नात येऊन 'ती' घाबरवते! पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेऊन जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 12:44 PM2021-11-17T12:44:31+5:302021-11-17T12:53:45+5:30
Crime News : सतत पडणारी वाईट स्वप्ने आणि भुताच्या भीतीतून एका पोलिसाने गळफास घेतला.
नवी दिल्ली - रात्री झोपेत असताना अनेकांना वाईट स्वप्न पडतात. यातील काही स्वप्न ही अस्वस्थ करणारी असतात. त्याचा मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. वाईट स्वप्न अन् भुताच्या भीतीने एक बळी घेतला आहे. स्वप्नात येऊन 'ती' घाबरवते असं म्हणत एका पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. तामिळनाडूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सतत पडणारी वाईट स्वप्ने आणि भुताच्या भीतीतून एका पोलिसाने गळफास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रभाकरन असं आत्महत्या केलेल्या 33 वर्षीय पोलिसाचं नाव आहे. प्रभाकरन विवाहित असून त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. ते कुड्डालोरमधील पोलीस क्वार्टरमध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रभाकरनला भूताची भीती वाटत असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
वाईट स्वप्न अन् भुताच्या भीतीने घेतला बळी
प्रभाकरन यांनी एक वाईट स्वप्न पाहिलं होतं. ज्यामध्ये आगीमध्ये जळालेली एक महिला त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. आपल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबीयांना त्यांनी या स्वप्नाविषयी माहिती दिली होती. त्यामुळेच त्याच्या मनात भुताची भीती होती. तो सतत घाबरलेला असायचा. प्रभाकरनची तब्येत गेल्या अनेक दिवसापासून खराब होती आणि त्याच्यावर उपचार सुरू होते.
पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडत असल्याने प्रभाकरनने ज्योतिषांचीही मदत घेतली. बरे होण्यासाठी त्याने 15 दिवसांची सुट्टीही घेतली होती. याच दरम्यान, त्याची मुलं व पत्नी एका लग्न समारंभाला गेले असता त्यांने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. कुटुंबीय परत आले तेव्हा त्यांना प्रभाकरनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून तपास सुरू आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.