Crime News: पूजा कालीदेवीची, मात्र कार्यक्रमात तरुणींचा अश्लील नाच, गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: October 30, 2022 12:02 AM2022-10-30T00:02:37+5:302022-10-30T00:03:01+5:30
Crime News: मीरारोडच्या शीतल नगर परिसरात एका आयोजकाने कालीदेवीची पूजा व भंडाराचा कार्यक्रम सार्वजनिक रस्त्यात ठेवला होता मात्र प्रत्यक्षात गाण्यांवर तरुणींचा अश्लील नाच - गाण्याचा कार्यक्रम चालविल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
- धीरज परब
मीरारोड - मीरारोडच्या शीतल नगर परिसरात एका आयोजकाने कालीदेवीची पूजा व भंडाराचा कार्यक्रम सार्वजनिक रस्त्यात ठेवला होता मात्र प्रत्यक्षात गाण्यांवर तरुणींचा अश्लील नाच - गाण्याचा कार्यक्रम चालविल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
२८ ऑक्टोबर रोजी मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्या नुसार , मीरारोडच्या शीतल नगर मधील डिसीबी बँके जवळ सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर स्टेज बांधून रात्री उशिरा पर्यंत नाच गाण्याचा कार्यक्रम चालत असल्याच्या तक्रारी जागरूक नागरिकांनी केल्या . त्या नंतर मीरारोड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक हनीफ शेख व हवालदार बालाजी हरणे हे घटनास्थळी पोहचले असता काली देवीच्या पूजा व भंडाऱ्याचा कार्यक्रम असा फलक लावून स्टेज वर मात्र चित्रपटातील गाण्यांवर २ तरुणी अश्लील हावभाव करत नाचत असल्याचे दिसून आले . त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती . पोलिसांनी कार्यक्रमाचा आयोजक संजीवकुमार सदानंद सिंह ( ४६) रा . शितल फोरम, शितलनगर ह्याला कार्यक्रम बंद करायला लावून ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले .
पोलिसां कडे ध्वनिमापक यंत्र नाही
रात्री पावणे अकरा वाजले तरी सदर ध्वनिक्षेपक लावून नाच गाण्याचा धिंगाणा सुरु होता . घटना स्थळी पोलीस पोहचले व त्यांनी कार्यक्रम बंद करायला लावला. परंतु पोलिसां कडे ध्वनिमापक यंत्र नसल्याने आवाजाची पातळी नोंद करता आली नाहीच शिवाय ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई सुद्धा पोलिसांना करता आली नाही असे उघड झाले आहे . ध्वनी प्रदूषण अधिनियम प्रमाणे कारवाई होणे आवश्यक असताना देखील कारवाई न झाल्याने जागरूक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे .