Crime News : जास्तीचे भाडे नाकारल्याने महिलेला अश्लील संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:53 AM2021-10-11T10:53:08+5:302021-10-11T10:53:23+5:30
Crime News: जास्तीचे भाडे दिले नाही म्हणून उबेर टॅक्सीचा दलाल म्हणून काम करणाऱ्या तरुणाने महिला प्रवाशासह तिच्या पतीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अश्लील व्हिडीओ, फोटो तसेच संदेश पाठविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई : जास्तीचे भाडे दिले नाही म्हणून उबेर टॅक्सीचा दलाल म्हणून काम करणाऱ्या तरुणाने महिला प्रवाशासह तिच्या पतीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अश्लील व्हिडीओ, फोटो तसेच संदेश पाठविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी उबेर टॅक्सी दलाल उत्सवकुमार प्रमोद शुक्ला (१८) याला बिहार येथून अटक केली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जुलै रोजी त्यांचे पती आणि सासऱ्यांना बोरिवली येथे बैठकीला जायचे असल्याने त्यांनी उबेर बुक करण्यासाठी चारच्या सुमारास शुक्लाला फोन केला. मात्र त्याने टॅक्सी बुक केली नाही. त्यानंतर सहाच्या सुमारास फोन करून उबेर बुक केल्याचे सांगितले. याचदरम्यान उबेर टॅक्सीने बोरिवलीहून घरी परतत असताना, शुक्लाने दिलेल्या चालकाने जास्तीच्या भाड्याची मागणी केली. तक्रारदार यांच्या पतीने नकार देत, दुसऱ्या टॅक्सीने घर गाठले.
याच रागातून ४ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास शुक्लाने महिलेला कॉल करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच वेगवेगळ्या मोबाइलवरून फोन करून तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲपद्वारे अश्लील व्हिडिओ, फोटो, संदेश पाठवले. तक्रारदार यांनी तत्काळ एल. टी. मार्ग पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. एलटी मार्ग पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तपासात, आरोपी बिहार येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला बिहारमधून अटक केली.
छत्तीसगडमधून एकाला अटक
मलबार हिल येथील महिलेला २५ जून रोजी फेसबुकवर अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर अश्लील संदेश, फोटो पाठविण्यास सुरुवात केली. त्यांनी मलबार हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तांत्रिक तपासात, आरोपी छत्तीसगडमध्ये असल्याचे उघड आले. त्यानुसार, छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातून सुमीतकुमार सुरेश सिंग (२४) याला शनिवारी अटक केली आहे.