संतापजनक! महिलेने दुसरं लग्न केल्याने जातपंचायतीचं तुघलकी फर्मान; लाखोंचा दंड अन् अमानुष शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 03:37 PM2021-11-16T15:37:35+5:302021-11-16T15:39:34+5:30
Crime News : महिलेने दुसरं लग्न केलं म्हणून पीडित कुटुंबाला अमानुष शिक्षा देण्यात आली आहे. तसेच कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला असून तब्बल 11 लाखांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे.
नवी दिल्ली - देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना आता घडली आहे. महिलेने दुसरं लग्न केलं म्हणून पीडित कुटुंबाला अमानुष शिक्षा देण्यात आली आहे. तसेच कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला असून तब्बल 11 लाखांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात असाच माणुसकीला काळीमा असणारा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने दुसरे लग्न केले म्हणून तिच्या कुटुंबीयांना 11 लाखांचा दंड आणि त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील सेडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंवार गावात हा लज्जास्पद प्रकार घडला. महिलेने आपल्या मर्जीने लग्न केल्यानंतर जातपंचायतीने तुघलकी फर्मान काढून एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला. पीडित कुटुंबाला तब्बल 11 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे. आता पीडित कुटुंबाने न्यायासाठी बाडमेर पोलिसांत धाव घेतली आहे. पीडित कुटुंबीयांनी 35 जणांसह अन्य काही जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पीडितेच्या कुटुंबाला 11 लाख रुपये दंड
2020 मध्ये गावातील महिलेचं वेरशीराम याच्याशी लग्न झाले. याआधी तिचे पहिले लग्न श्रवण कुमार याच्याशी झाले होते. तो सध्या तुरुंगात आहे. आपल्या मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तो तुरुंगात गेल्यानंतर महिलेने घटस्फोट घेत दुसरे लग्न केले. मात्र, पहिल्या पतीच्या कुटुंबीयांनी तिच्या लग्नाला विरोध केला. हे प्रकरण जातपंचायतीसमोर गेल्यानंतर पंचांनी तुघलकी फर्मान काढत पीडितेच्या कुटुंबाला 11 लाख रुपये दंड आणि त्यांना वाळीत टाकण्यात येत असल्याचे सांगितलं.
समाजातून करण्यात आले बहिष्कृत
पीडिता आणि तिच्या पतीने पैसे भरण्यास नकार दिल्यानंतर त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. पीडिता सेडवा पोलीस ठाण्यात पोहोचली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी, अद्याप कारवाई झाली नाही. त्यामुळे पीडितेने आता बाडनेर पोलिसांत धाव घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.