सावधान! KBC च्या नावाने घातला 90 लाखांचा गंडा; 'असा' ओढायचा जाळ्यात, 4 वर्षांनी पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 11:29 AM2022-02-27T11:29:35+5:302022-02-27T11:37:55+5:30
Crime News : 90 लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणात जन्मजय दास (44 ) याला ओडिशाहून अटक केली आहे.
नवी दिल्ली - सीआयडीने (CID) तब्बल 90 लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणात आरोपीला ओडिशात अटक केली आहे. आरोपीने कौन बनेगा करोडपतीच्या जॅकपॉटचं बक्षीस देण्याच्या नावाखाली हा गुन्हा केला. हा गुन्हा 2018 मध्ये सीआयडी रांचीच्या सायबर सेलमध्ये दाखल झाला होता. यानंतर आता आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 90 लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणात जन्मजय दास (44 ) याला ओडिशाहून अटक केली आहे. आरोपीने यापूर्वी छत्तीसगड आणि देहरादून येथेही सायबर फसवणूक केली आहे.
आरोपीकडून एक मोबाईल आणि आधार कार्ड जप्त करण्यात आलं आहे. सायबर एसपी कार्तिक एसने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या केंद्रपाडा येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. जॅकपॉटच्या नावाने जवळपास 90 लाखांचा गंडा घातला. आरोपी या गुन्ह्याअंतर्गत विविध व्हर्च्युअल नंबरवरुन लोकांना इंटरनेट कॉल करीत होता आणि त्यांना केबीसी जॅकपॉटमध्ये विजेता होण्याचं आश्वासन दिलं जात होतं. केबीसीमध्ये पुढे खेळण्यासाठी आणि अधिक पैसे जिंकण्यासाठी लोकांना प्रश्न विचारत होता.
जिंकलेल्या पैसे मिळवण्यासाठी जीएसटी आणि अन्य चार्जच्या नावाखाली विविध बँक खात्यात धोका देऊन पैसे जमा करण्यास सांगत होता. या प्रकरणात सीआयडीने आवाहन केलं आहे की, कोणत्याही अज्ञात मोबाईल नंबरवरुन केबीसी जॅकपॉटच्या नावाखाली कॉल आल्यास स्वत:चे खासगी माहिती शेअर करू नये. केबीसीच्या नावाखाली कोणतेही कॉल आले तर केबीसीचं ऑफिस किंवा वेबसाईटवर जाऊन खात्री करू घ्या. लॉटरीच्या नावाखाली येणाऱ्या कॉलच्या जाळ्यात अडकू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.