भयंकर! बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गावकऱ्यांची आरोपीला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 03:48 PM2022-01-07T15:48:26+5:302022-01-07T15:49:36+5:30
मुलीच्या वडिलांनी आरडाओरडा केल्यामुळे गावकरी गोळा झाले आणि त्यांनी आरोपीला पकडले.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. बंदुकीचा धाक दाखवत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सैनी पोलीस ठाण्यात बलात्काराची घटना नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. मुलीच्या वडिलांनी आरडाओरडा केल्यामुळे गावकरी गोळा झाले आणि त्यांनी आरोपीला पकडले. मारहाण केली आणि त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या घराच्या भिंतीवरुन उडी घेत आरोपी घरात घुसला होता. पीडित मुलगी रात्री बाथरुमला जाण्यासाठी आपला रुमचा दरवाजा खोलून बाहेर आली असता आरोपीने तिच्यावर बंदूक रोखली. बंदुकीच्या धाकावर आरोपी मुलीला एका रुममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. यादरम्यान मुलीने आरडाओरडा केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून वडिलांना जाग आली. त्यांनी जाऊन पाहिले असता आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. वडिलांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जागे झाले.
गावकऱ्यांनी मुलीच्या घराकडे धाव घेत आरोपी तरुणाला घेराव घातला. गावकऱ्यांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीकडील बंदूक जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आरोपीने आपल्या डोक्यावर बंदूक लावले आणि आवाज बंद करण्यास सांगितले आणि तो आपल्याला खोलीत घेऊन गेला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत चुकीचे कृत्य केले असं पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री तीन वाजता त्यांच्या मुलीवर एका मुलाने बंदुक रोखली. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर आपल्याही बंदुकीचा धाक दाखवला. पण आपण कसेतरी बाहेर पडून आरडाओरडा केला. त्यानंतर गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून त्यानुसार पुढील कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक समर बहादूर यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.