लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीची गळा आवळून हत्या, प्रियकर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 04:31 PM2020-08-16T16:31:59+5:302020-08-16T16:32:22+5:30
बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास टाटा आमंत्रा बिल्डींगच्या नजीकच्या परिसरातील झाडाझुडपांत तरूणीचा मृतदेह छोटया झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला होता.
कल्याण: भिवंडी कोनगाव परिसरात टाटा आमंत्रा बिल्डींगच्या नजीक एका तरूणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत बुधवारी आढळुन आला होता. याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले आहे. प्रियकर दिपक जगन्नाथ रूपवते याला अटक करण्यात आली आहे. तो कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात राहणारा आहे.
बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास टाटा आमंत्रा बिल्डींगच्या नजीकच्या परिसरातील झाडाझुडपांत तरूणीचा मृतदेह छोटया झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला होता. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. दरम्यान भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा बिल्डींगचे मागे एका महिलेला तिच्या प्रियकराने जीवे मारले आणि तो प्रियकर डोंबिवली पश्चिम भागात फिरत आहे अशी माहीती शनिवारी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. ही माहीती भोसले यांनी वरीष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन यांना कळविली. त्यांनी कोनगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता त्यांना तरूणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आल्याची माहीती प्राप्त झाली. यावरून जॉन यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक भूषण दायमा, पोलिस उपनिरिक्षक नितीन मुदगुन आणि पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, राजेंद्र घोलप, अजित राजपूत, मंगेश शिर्के, बाळा पाटील, सुरेश निकुळे, हरीश्चंद्र बंगारा, राहुल ईशी आदिंचे पथक डोंबिवली पश्चिमेत रवाना केले. पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन रेल्वे स्टेशन परिसर, गुप्ते रोड, भागशाळा मैदान असा परिसर पिंजून काढला.
अखेर कोपर रेल्वे उड्डाणपूलाजवळ एक व्यक्ती गुप्त बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणो संशयास्पद स्थितीत फिरताना दिसली. त्या व्यक्तीला पोलिसांचा संशय येताच ती पळू लागली. मात्र पथकाने त्या व्यक्तीला पाठलाग करून पकडले व ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव दिपक रु पवते असल्याचे सांगण्यात आले.
कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात राहणा-या रूपवते याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने वाडेघर परिसरात राहणा-या त्याच्या प्रेयसीची लग्नाला नकार देत असल्याकारणामुळे हत्या केल्याची कबुली दिली. तीला 9 ऑगस्टला संध्याकाळी चारच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास कल्याण येथील फडके मैदान येथून भिवंडी बायपास येथे रिक्षाने आणले आणि टाटा आमंत्रा बिल्डिंगचे जवळ झाडा- झुडपात नेऊन तीची ओढणीने गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह ओढणीसह झाडाला लटकवुन तिने आत्महत्या केली आहे असा देखावा बनवुन तेथून पलायन केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. आत्महत्या केल्याचा बनाव केलेल्या प्रकरणाचा शिताफीने तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले असून आरोपी रूपवते याला पुढील कारवाई करीता कोनगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.