भुसावळातील खून प्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरी
By चुडामण.बोरसे | Published: September 5, 2022 05:43 PM2022-09-05T17:43:59+5:302022-09-05T17:44:49+5:30
पाच वर्षांपूर्वी विसर्जन मिरवणुकीत घडली होती घटना
भुसावळ: श्री विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून ललित हरि मराठे याचा खून झाला होता. या प्रकरणी आरोपी गोली उर्फ राजेंद्र उर्फ गणेश सुभाष सावकारे (२५, रा. न्यू एरीया वार्ड, तुळजापूर मंदिराजवळ, भुसावळ) याला सात वर्षे सक्तमुजरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी सोमवारी हा निकाल दिला. विशेष म्हणजे पाच वर्षापूर्वी पाच सप्टेंबर रोजी याच दिवशीची खुनाची घटना घडली होती आणि पाच सप्टेंबर रोजीच या खून खटल्याचा निकालही लागला.
५ सप्टेंबर २०१७ रोजी शहरात श्री विसर्जन मिरवणूक सुरु होती. त्यात न्यू इंडिया सब्जी मंडळाचा कार्यकर्ता ललित मराठे (२६, रा. न्यू एरीया वार्ड, तुळजापूर मंदिराजवळ, भुसावळ) व आरोपी गणेश सावकारे सावकारे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. मिरवणूक बाजारपेठ पोलीस स्थानकाजवळ आली असता ललित मराठे याच्यावर गणेश सावकारे याने छातीच्या डाव्या बाजूस धारदार चाकूने वार केले होते. यात ललित मराठे याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी ललित याचा आते भाऊ धीरज मराठे याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात आरोपीस सात वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होणार आहे. या खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक ॲड. प्रवीण भोंबे यांनी तर फिर्यादीतर्फे ॲड. प्रफुल्ल आर. पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार धनसिंग राठोड व सहाय्यक फौजदार शेख रफिक शेख कालू यांनी मदत केली.