Crime News: धक्कादायक! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, प्रेयसीचे ६ तुकडे केले, वेगवेगळ्या ठिकाणी फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:27 PM2022-11-21T13:27:13+5:302022-11-21T13:27:26+5:30
Crime News: दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली असतानाच आता एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचं लग्न अन्य व्यक्तीशी झाल्याने संतापाच्या भरात तिचे तुकडे तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
लखनौ - दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली असतानाच आता अशाच प्रकारची भयावह घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. येथे एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचं लग्न अन्य व्यक्तीशी झाल्याने संतापाच्या भरात तिचे तुकडे तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
श्रद्धा वालकर हत्याकांडाशी मिळतेजुळते असे हे भयानक हत्याकांड उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्ह्यात घडले आहे. तेथील अहरौली पोलीस ठाण्याच्या परिसरात एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून त्याचे सहा तुकडे केले.
पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, १६ नोव्हेंबर रोजी गौरी का पुरा नावाच्या गावात रस्त्याशेजारी एका तरुणीचा तुकडे तुकडे केलेला मृतदेह सापडला होता. तिची ओळख इसहाकपुरा येथील रहिवासी केदार प्रजापती यांची कन्या आराधना अशी पटली होती. पोलिसांनी या प्रकरणात पुराव्यांचे धागेदोरे मिळवत मुख्य आरोपी प्रिंस यादव याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आपला गुन्हा कबूल करत भयावह कबुलीजबाब दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रिंस यादव आणि आराधना यांचे आधीपासून प्रेमसंबंध होते. मात्र आराधनाचं लग्न दुसऱ्याच व्यक्तीसोबत झाल्याने प्रिंस संतप्त झाला होता. त्यातून त्याने आराधनाची हत्या करण्याचा कट रचला. या प्रकरणात त्याला त्याचे आई-वडील, मामा-मामी, मामाचा मुलगा आणि त्याच्या पत्नीनेही मदत केली. हा गुन्हा करताना प्रिंसच्या मामाचा मुलगा सर्वेशही त्याच्यासोबत होता. आता पोलीस या प्रकरणी पाच महिलांसह आठ आरोपींचा शोध घेत आहेत.
आरोपी प्रिंस हा आखाती देशात शारजामध्ये लाकूड कापण्याचं काम करतो. त्याचे आराधनासोबत प्रेमसंबंध होते. मात्र यादरम्यान, फेब्रुवारी २०२२ मध्ये तिचा विवाह एका अन्य एका तरुणासोबत झाल्याने तो शारजाहून परत आला होता.
९ नोव्हेंबर रोजी तो आराधनाला भैरव धामच्या दर्शनासाठी तिच्या घरातून घेऊन गेला. त्याने तिला एका रेस्टॉरंटमध्ये नेले. त्यानंतर तिला बळजबरीने मामाच्या उसाच्या शेतात नेले. तिथे प्रिंस आणि त्याच्या मामाच्या मुलाने तिची गळा दाबून हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिले.
मिळत असलेल्या माहितीनुसार प्रिंस याचे मामाचा मुलगा सर्वेश याच्या पत्नीसोबतही अफेअर सुरू होते. दरम्यान, पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केल्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी रात्री त्याला बेड्या ठोकल्या.