Crime News: धक्कादायक प्रकार! मंत्रतंत्र, भूतबाधेची भीती दाखवून मांत्रिकाने शेकडो महिला, मुलींवर केले अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 03:52 PM2022-03-22T15:52:49+5:302022-03-22T15:58:08+5:30
Crime News: राजस्थानमधील अजमेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ढोंगी तांत्रिकाने मंत्र तंत्राचा आधार घेत भूतातटकीची भीती दाखवत शेकडो महिला आणि मुलींची अब्रू लुटल्याचे उघड झाले आहे. Rajendra Valmiki असे या तांत्रिकाचे नाव आहे.
जयपूर - राजस्थानमधील अजमेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ढोंगी तांत्रिकाने मंत्र तंत्राचा आधार घेत भूतातटकीची भीती दाखवत शेकडो महिला आणि मुलींची अब्रू लुटल्याचे उघड झाले आहे. राजेंद्र वाल्मिकी असे या तांत्रिकाचे नाव आहे. एका पीडित महिलेने तक्रार केल्यावर या तांत्रिकाचे बिंग फुटले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत या तांत्रिकाच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, अंधविश्वासाच्या अधीन झालेल्या शेकडो कुटुंबातील महिला आणि मुलींच्या अब्रुला या तांत्रिकाने हात घातला असून, आतापर्यंत ३०० ते ४०० कुंटुंबे या तांत्रिकाची शिकार झाली आहेत.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार भूत प्रेत उतरण्याचे सोंग घेऊन हा तांत्रिक भोळ्याभाबड्या कुटुंबानां आपल्या जाळ्यात ओढत असे. गंभीर बाब म्हणजे सुशिक्षित कुटुंबेही या तांत्रिकाची शिकार झाली आहेत. अंगातील भूत प्रेत काढण्याच्या नावावर हा तांत्रिक महिला आणि मुलींचं लैंगिक शोषण करत होता. तसेच त्यांच्याकडून भरपूर पैसेही लाटत असे. तसेच हा तांत्रिक पीडित कुटुंबांना मृत्यूची एवढी भीती घालायचा की संपूर्ण कुटुंबच त्याच्यासमोर समर्पण करायचे.
सांगवान यांनी सांगितले की, या पाखंडी तांत्रिकाला जेरबंद करण्यामध्ये अजमेरमधील एका पीडितेने दाखवलेली हिंमत महत्त्वाची ठरली. तिने कुटुंबीयांचा विरोध झुगारत पोलिसांकडे तक्रार केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी या तांत्रिकाशी संपर्क साधून त्यांच्या मुलीवर आलेल्या भूताचा उतारा कऱण्यासाठी भरपूर पैसे दिले होते. मात्र भूत उतरण्याच्या बहाण्याने या तांत्रिकाने या कुटुंबाच्या अब्रूलाच हात घातला.
सदर तांत्रिकाला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याने पोलिसांवरच जादूटोणा करण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांच्या खाक्यापासून तो फारवेळ वाचू शकला नाही. दरम्यान, आरोपी हा वयाच्या १८ व्या वर्षापासून या कुकृत्यामध्ये गुंतला असून, त्याने आतापर्यंत ३०० ते ४०० कुटुंबांना आपली शिकार बनवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या आरोपीची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच हे प्रकरण केस ऑफिसर स्किममध्ये घेऊन तपासासाठी एसआयटीची स्थापना झाली आहे.