Crime News: धक्कादायक! बलात्काराच्या आरोपींना ग्रामस्थांनी जिवंत जाळले, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 04:19 PM2022-06-09T16:19:47+5:302022-06-09T16:20:13+5:30
Crime News: बलात्काराच्या दोन आरोपींना ग्रामस्थांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात सुनील उरांव नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे.
रायपूर - झारखंडमधील गुमला जिल्ह्यामध्ये बलात्काराच्या दोन आरोपींना ग्रामस्थांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना रांचीमधील रिम्समध्ये पाठवण्यात आले आहे. येथे सुनील उरांव नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. दोन्ही तरुणांवर बलात्काराचा आरोप होता.
गुमला जिल्ह्यातील बसुआ आम्बाटोली गावामध्ये बुधवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. येथे ग्रामस्थांनी दोन तरुणांना दुचाकीसह पेटवून दिले. त्यात सुनील उरांव आणि आशीष कुमार हे होरपळले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गावातील एक तरुणी तिच्या आईसोबत एके ठिकाणी गेली होती. त्यावेली या तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे तरुणीचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी आरोपींना पकडून गावात आणले. येथे दोघांवरही पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. मात्र तेवढ्याने ग्रामस्थांचा राग शांत झाल नाही. त्यांनी आरोपींवर धारदार हत्याराने हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की, या घटनेमध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या सुनील उरांव याचा मृत्यू झाला. तर आशिष नावाचा तरुण गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेनंतर गावामध्ये तणावाचं वातावरण आहे.
या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी गावात तळ ठोकला आहे. गंभीररीत्या जखमी झालेल्या आरोपी तरुणांनी सांगितले की, त्यांनी सदर तरुणीसोबत काहीही चुकीचं केलेलं नाही. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर काही ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत. ते पारंपरिक हत्यारं घेऊन तरुणीच्या कुटुंबीयांना गावाच्या ताब्यात देण्याची मागणी करत आहेत.