Crime News:नांदेडातील बिल्डर संजय बियाणींच्या खुनाचा तपास पाच पैलूंवर केंद्रित, रेकाॅर्डवरील ४५ गुन्हेगार ताब्यात, एसआयटी स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:09 AM2022-04-07T11:09:01+5:302022-04-07T11:10:27+5:30
Sanjay Biyani Murder Case: बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी भरदिवसा गाेळ्या घालून हत्या करण्यात आली हाेती. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथके) स्थापन करण्यात आली असून, या पथकांनी पाच पैलूंवर तपास चालविला आहे.
नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी भरदिवसा गाेळ्या घालून हत्या करण्यात आली हाेती. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथके) स्थापन करण्यात आली असून, या पथकांनी पाच पैलूंवर तपास चालविला आहे.
पाेलीस सूत्रांनी सांगितले की, अप्पर पाेलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे एसआयटीचे नेतृत्व देण्यात आले आहे. या एसआयटीमध्ये परिक्षेत्रातील गुन्हे उघडकीस आणण्यात तज्ज्ञ असलेल्या पाेलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात खंडणी, व्यावसायिक स्पर्धा, गुंतवणूक, रियल इस्टेट यासारखे अनेक मुद्दे पुढे येत आहेत. या सर्व मुद्द्यांची प्राथमिक पडताळणी पाेलिसांकडून केली जात आहे. एसआयटीसाेबतच संबंधित पाेलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा हेसुद्धा समांतर तपास आपल्या स्तरावर करीत आहेत. पाेलिसांची पथके लगतच्या जिल्ह्यातच नव्हे, तर तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतही गेली आहेत.
खुनासाठी ९ एमएम काडतुसाचा वापर
संजय बियाणी यांच्या खुनासाठी वापरलेले पिस्टल व त्यातील काडतूस हे ९ एमएम आकाराचे असल्याचे सांगितले जाते.
नांदेडमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अग्निशस्त्राचा वापर करण्यात आला आहे. ही शस्त्रे मुंबईमध्ये सहज उपलब्ध हाेत असल्याचेही सांगण्यात आले.
नांदेडात कोम्बिंग ऑपरेशन
संजय बियाणी यांच्या हत्येनंतर मंगळवारी रात्री पाेलिसांनी नांदेड शहरात काेम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यात रेकाॅर्डवरील तब्बल ४५ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चाैकशी केली जात आहे.
अशाेक चव्हाण आज गृहमंत्र्यांना भेटणार
जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेक चव्हाण बुधवारी सकाळीच शहरात दाखल झाले. त्यांनी बियाणी यांचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.
आता अशोक चव्हाण गुरुवारी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना या घटनेबाबत माहिती देणार आहेत. शिवाय पाेलीस महासंचालकांची प्रत्यक्ष भेटही घेणार आहेत.
पोलिसांविरोधात असंतोष : संजय बियाणी यांच्या हत्येचा सर्वत्र निषेध नोंदविला जात आहे. बुधवारी या घटनेच्या निषेधार्थ नांदेडची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. संजय बियाणी यांची अंत्ययात्रा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर थांबवून यावेळी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बियाणी यांच्या पार्थिवावर गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले. बियाणी यांच्या मागे पत्नी, भाऊ, दोन विवाहित मुली, मुलगा असा परिवार आहे.
‘पतीची सुपारी देणाऱ्या हुकमी एक्क्याला अगोदर पकडा’
माझ्या पतीला मारण्याची सुपारी देणाऱ्या हुकमी एक्क्याला अगोदर धरा, नंतर त्या दुसऱ्या पेंद्यांना धरा. आज माझ्यासोबत झाले, उद्या नांदेडच्या कुणासोबतही होऊ शकते. कुठे आहेत कमिशनर, कलेक्टर? असा संतप्त सवाल करीत मृत बांधकाम व्यावसायिक
संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी टाहो फोडला. यावेळी घरासमोर अंत्यदर्शनासाठी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येला
२४ तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर मारेकरी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. याबाबत बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी बुधवारी संतप्त प्रतिक्रिया दिली.
माझ्या पतीला घरासमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पोलिसांनी फक्त एफआयआर लिहिला. माझे, माझ्या मुलीचे अन् नोकरांचे मोबाईल मागत आहेत. पण कमिशनर, कलेक्टर अजून कशामुळे आले नाहीत? घरी झोपा काढत आहेत काय? माझ्या पतीची सुपारी देऊन हत्या करण्यात आली आहे. तो सुपारी देणारा कितीही मोठा असो, त्याला पहिले धरा. मग मारणाऱ्यांना पकडा. मला न्याय मिळाला नाही तर, मी मुंबई, दिल्लीपर्यंत जाईन, असा इशाराही त्यांनी दिला.
पालकमंत्र्यांचा व्यापाऱ्यांना दिलासा
राजस्थानी समाज, विविध संघटना व व्यापाऱ्यांनी काढलेल्या माेर्चाला पालकमंत्री अशाेक चव्हाण स्वत: सामाेरे गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी निवेदन स्वीकारले. कुणीही घाबरण्याचे कारण नाही, कुणाला धमकी आली असेल, तर त्यांनी निर्भयपणे पाेलिसांकडे जावे, पाहिजे तर माझ्याकडे यावे, त्यांचे नाव गाेपनीय ठेवले जाईल, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असे आवाहन करून चव्हाण यांनी माेर्चेकऱ्यांना दिलासा दिला.