सावकाराच्या तगाद्याने खोतवाडीच्या तरुणाची आत्महत्या
By शीतल पाटील | Published: October 9, 2022 08:21 PM2022-10-09T20:21:44+5:302022-10-09T20:22:54+5:30
पत्नीची फिर्याद, सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: खोतवाडी (ता. मिरज) येथील विशाल उर्फ अविनाश आनंदा कुरणे (वय ३४) या तरुणाने सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत त्याची पत्नीने सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनंतर संजय वसंत माने (वय ४५, रा. शालीमार, सांगली) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा टक्के व्याजदराने घेतलेल्या तीन लाख रुपयांचे व्याज वेळेत भरुनही माने याने पैशासाठी तगादा लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयत अविनाश कुरणे यांनी संशयित संजय माने याच्याकडून दरमहा दहा टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कुरणे याने वेळोवेळी त्या रकमेचे व्याज दिले. जानेवारी ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील व्याज २ लाख ७० हजार आणि मुद्दल ३ लाख असे एकूण ५ लाख ७० हजार रुपये द्यावेत, याकरिता माने याने अविनाशच्या पाठीमागे तगादा लावला होता. रक्कम देण्यास शक्य होत नसेल तर घर, दुकान आणि जमीन नावावर करुन देण्यासाठी दबाव आणला होता. सततच्या मानसिक त्रासास कंटाळून अविनाश कुरणे याने खोतवाडी गावातील स्मशानभूमीनजीक असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतचे सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अधिनियम व महाराष्ट्र सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अद्याप अटक केलेली नाही.