Crime News: ‘त्या’ अफ्रिकन तस्कराकडून ठाणे पोलिसांनी जप्त केले आणखी २२ लाखांचे कोकेन
By जितेंद्र कालेकर | Published: August 10, 2022 09:54 PM2022-08-10T21:54:20+5:302022-08-10T21:55:49+5:30
Crime News: अफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस उर्फ किंग ( सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई ) याच्या ताब्यातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने आणखी २२ लाख ८० हजारांचे ५६ ग्रॅम कोकेन हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी बुधवारी दिली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - अफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस उर्फ किंग ( सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई ) याच्या ताब्यातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने आणखी २२ लाख ८० हजारांचे ५६ ग्रॅम कोकेन हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी बुधवारी दिली. आतापर्यंत त्याच्याकडून ४६ लाख ८० हजारांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर भागातील हिंदुस्थान रेसिडेंसी हॉटेल, येथे कोकेन या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या कोफी याला अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन, जमादार शशीकांत सालदुर, सुनिल अहिरे आणि पोलीस हवालदार सुनिल रावते आदींच्या पथकाने ३ आॅगस्ट रोजी सापळा रचून अटक केली.
त्याच्या ताब्यातून सुरुवातीला २४ लाखांचे ६० ग्रॅम इतके कोकेन, एक मोबाईल, रिपब्लीक आॅफ आयवोरी कोस्ट या देशाचा पासपोर्ट आणि विजा आदी जप्त केले होते. दरम्यान, सखोल चौकशीतून त्याच्या मुंबईतील घरातून या पथकाने आणखी ५६ ग्रॅम कोकेन जप्त केले. त्याला सुरुवातीला ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. आता त्याच्या कोठडीत आणखी वाढ केली असून त्याला १२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मंगळवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.